विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे विधि पदवीच्या (२०१७ पॅटर्न) पहिल्या वर्षांतील फुटलेली प्रश्नपत्रिका पुन्हा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आल्यामुळे निर्माण झालेला तिढा मंगळवारी संबंधितांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्यानंतर निकाली निघाला. संबंधित प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवावीच लागेल. त्यात दोन्हीपैकी ज्या प्रश्नपत्रिकेत अधिक गुण असतील ते ग्राह्य़ धरण्याचे विद्यापीठाने मान्य केले आहे.

या बाबतची माहिती विद्यार्थी नेते अजिंक्य गिते यांनी दिली. पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेत गोंधळ होणे यात आता नवीन राहिलेले नाही. विधि पदवी परीक्षाही अनेक कारणांस्तव त्याला अपवाद राहिलेली नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत त्याची पुनरावृत्ती झाल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. एलएलबी- १ (२०१७ पॅटर्न) या अभ्यासक्रमाची फेब्रुवारीमध्ये विद्यापीठाने परीक्षा घेतली होती. त्या अंतर्गत १५ फेब्रुवारीला ‘लॉ ऑफ क्राइम्स’ आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ तारखेला पर्यायी आयपीआर विषयाची परीक्षा झाली. विद्यापीठाकडून परीक्षेच्या तयारीसाठी संकेतस्थळावर काही नमुना प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या माहितीस्तव प्रसिद्ध केली जाते. संकेतस्थळावर प्रसिध्द झालेली प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्षात परीक्षेत आलेली प्रश्नपत्रिका यांच्यात निम्म्याहून अधिक साम्य असल्याचे नंतर निदर्शनास आले. ही बाब लक्षात आल्यावर विद्यापीठाने घाईघाईत संबंधित विषयाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर दिली. मुळात ही चूक विद्यापीठातील संबंधित विभागातील कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्याचा जाच विद्यार्थ्यांना देऊ नये, प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार ज्या कर्मचाऱ्यामुळे झाला, त्यावर फौजदारी कारवाई करावी, विद्यार्थ्यांना परीक्षेतून सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याच मुद्यावर मंगळवारी विधि शाखेतील विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात धडक दिली.  गिते यांच्या नेतृत्वाखाली तुषार जाधव, वैभव वाघचौरे, महेश गायकवाड, कृष्णा सरोदे, राधिका रत्नपारखी, सोनम दातीर आदींनी विद्यापीठाच्या येथील कार्यालयात ठिय्या दिला. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यापीठाच्यावतीने आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली. विद्यापीठाने तांत्रिक मुद्दे आंदोलकांना समजावून दिले. पुन्हा परीक्षा देणे विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे नमूद केले. पुन्हा परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानही होऊ शकते. आधीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर नाहक अन्याय होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. अखेरीस या वादावर दोन्हीपैकी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांला अधिक गुण असतील, तेच गुण ग्राह्य़ धरण्यास विद्यापीठाने मान्यता दिली. या बाबतची माहिती अजिंक्य गिते यांनी दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टळू शकेल. नव्याने परीक्षा कधी होईल, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

चार हजार विद्यार्थ्यांना फटका

विद्यापीठाच्या निर्णयामुळे नाशिक, नगर आणि पुण्यातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र दोन्ही परिक्षेतील ज्यात अधिक गुण मिळतील, ते ग्राह्य़ धरले जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांडय़ात पडला आहे.