17 November 2019

News Flash

शाळा उपाहारगृहातून ‘जंक फूड’ हद्दपारीसाठी तपासणी

शाळांमधील मुख्याध्यापकांसोबत अधिकारी वर्ग बैठका घेऊन पोषण आहारात आवश्यक खाद्यपदार्थाची चर्चा करीत आहेत.

संग्रहित छायाचित्र

अन्न आणि औषध प्रशासनाचा पुढाकार

नाशिक : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडचे असणारे आकर्षण आणि त्यामुळे उद्भवणारे आजार पाहता शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने महिला बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने शाळांच्या उपाहारगृहावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शाळेच्या उपाहारगृहातून वेफर्स, शीतपेय, रसगुल्ले, गुलाबजाम, सर्व प्रकारच्या चघळण्याच्या गोळ्या, केक आणि बिस्कीटसह अन्य काही पदार्थ हद्दपार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिसरात या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने पुढाकार घेत शाळांना याबाबत पत्र पाठवत उपाहारगृहाच्या तपासणीस सुरुवात केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये जीवनसत्त्वाची असणारी कमतरता, त्यामुळे उद्भवणारे लठ्ठपणासह अन्य आजार पाहता महिला बाल विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना जादा मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ वर्जित करण्याबाबत आणि आरोग्यास लाभकारक असलेल्या पदार्थांचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय पोषण संस्थेने एक कार्यगट गठित केला आहे. या कार्यगटाने विद्यार्थ्यांच्या आहारातील पोषण मूल्ये सुधारून त्यांचा चांगल्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा यासाठी शिफारस केली आहे. नाशिक जिल्हा परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी सागर नेरकर यांनी दिली. जिल्ह्य़ातील खासगी आणि सरकारी शाळांमधील मुख्याध्यापकांसोबत अधिकारी वर्ग बैठका घेऊन पोषण आहारात आवश्यक खाद्यपदार्थाची चर्चा करीत आहेत. तर दुसरीकडे ७० लोकांचा समूह वेगवेगळ्या पथकातून शाळेच्या उपाहारगृहांचे सव्‍‌र्हेक्षण करत तेथे मिळणाऱ्या खाद्य पदार्थाची तपासणी करत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शाळांच्या उपाहारगृहातून जंक फुड हद्दपार करण्याची सुचना केली असल्याचे नेरकर यांनी सांगितले. या संदर्भात मुख्याध्यापकांसोबत बैठका सुरू असून त्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू आहे.

शाळा उपाहारगृहात आता हे खाद्य पदार्थ दिसणार..

ॠतुनिहाय मिळणाऱ्या भाज्यांचा वापर करून तयार केलेला पराठा, भात, भाजी, पुलाव आणि डाळ, गव्हाचा हलवा, काळा चणा, गोड दलिया, भात आणि पांढरा चणा, भात आणि राजमा कढीभात, बलगर गहू उपमा किंवा खिचडी, इडली, वडा, सांबर,  खीर, फिखणी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाज्यांचा उपमा, सॅण्डविच

First Published on July 3, 2019 4:20 am

Web Title: school canteen checked for deportation of junk food zws 70