नववीचे वर्ग नियमित सुरू राहण्याविषयी अधिकाऱ्यांचे आश्वासन

नाशिक : नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा होऊन तीन आठवडय़ाहून अधिक कालावधी लोटला असला तरी शहरातील वडाळा येथील महापालिका शाळा क्रमांक ८३ मध्ये अद्याप नववीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. याकडे महापालिका शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी काही विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेवर धडक दिली. शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडल्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी वर्ग नियमीत सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

शहरात महापालिकेच्या ८० हून अधिक शाळा असून माध्यमिक विद्यालयांची संख्या अत्यंत कमी आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या वडाळागाव परिसरात महापालिकेची शाळा क्रमांक ८३ आहे. या ठिकाणी मागील वर्षी नववीचे वर्ग सुरू करण्याविषयी प्राथमिक चर्चा झाली होती. तत्कालीन शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी १२ वी पर्यंत वर्ग करण्याच्या सुचनाही केल्या. त्यानुसार ८० विद्यार्थ्यांनी नववीच्या वर्गात प्रवेश घेतला. परंतु, नवीन शैक्षणिक वर्षांस आरंभ होऊन तीन आठवडय़ाचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग नाही. अभ्यासासाठी पुस्तके नाहीत. शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. अशा विचित्र स्थितीत हे विद्यार्थी शाळेत येऊन परत जात आहेत. या स्थितीकडे महापालिका शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शाळेचे काही विद्यार्थी, पालक आणि अन्य कार्यकर्ते यांनी महापालिकेवर धडक दिली. यावेळी  शाळेतील असुविधेचा पाढा वाचत शिकवण्यासाठी वर्ग तसेच विषय शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांनी विना परवानगी वर्ग सुरू केल्यामुळे या ठिकाणी कुठल्याच सुविधा देता आलेल्या नसल्याने वर्ग बंद करण्याचा आदेश काढला होता, अशी सारवासारव केली. पालक आणि विद्यार्थी यांचा प्रतिसाद पाहता पवित्र प्रणालीमधून शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच अन्य सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे जवळील शाळेत समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.

शाळा सुटू नये हीच इच्छा

वडाळा गाव येथील शाळा क्रमांक ८३ मध्ये नववीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीची कथा हृदय हेलावणारी आहे. वडील बेरोजगार असून दारू पिऊन मारझोड करतात. आई धुणीभांडीचे काम करत असून शिक्षणाची जबाबदारी आईने स्विकारली आहे. दारूला पैसे कमी पडत असल्याने मुलांचे शिक्षण बंद कर, असा तगादा वडिलांनी लावला आहे. त्यातच शाळेचे वर्ग बंद आहेत. घरी गेल्यावर वडिलांकडून, शिकून तू जिल्हाधिकारी होणार आहेस का?,  त्यापेक्षा तुझे लग्न लावून देतो, अशी धमकी दिली जाते.

घरात दिवसागणिक चिघळणारी परिस्थिती पाहता या मुलीला आपले शिक्षण सुटण्याची भीती वाटते. शाळेत नियमित वर्ग लवकरात लवकर सुरू व्हावेत एवढीच या विद्यार्थिनीची माफक अपेक्षा  आहे.