शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन
शालेय पोषण आहाराची जबाबदारी कार्यरत कर्मचाऱ्यांकडे व महिला बचत गटांकडे कायम ठेवण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरकारी निकषांमुळे जिल्ह्यातील १० हजारहून अधिक महिलांवर या निर्णयाचा विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा कृती समितीने केला.
मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय पोषण आहार कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण, नगर परिषद, महानगर पालिकांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याच्या कामासोबत शाळा उघडणे, देखरेख करणे, स्वच्छतेचे काम करत आहे. मात्र केंद्र व राज्य सरकाराने शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून राज्यातील एक लाख ८० हजार महिलांना मिळालेला रोजगार हिसकावून घेतला. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली या गोड नावाखाली महिला बचत गटासह अनेकांच्या रोजंदारीवर कुऱ्हाड कोसळली आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागात तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फतच विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यात महापालिका व ग्रामीण क्षेत्रातील शाळांमध्ये पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार कार्यरत पोषण आहार कर्मचारी व महिला बचत गट यांच्यामार्फत आहार पुरवठा करण्याचे करारनामे करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले आहे. हे काम आता कॉपरेरेट किंवा ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाने नागरी व ग्रामीण भागात कार्यरत वैयक्तिक स्वयंपाकी महिला व बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत एक लाख ८० हजार महिलांचे काम बंद होणार असून नाशिक जिल्ह्यात १० हजार महिलांचा रोजगार बुडणार असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.
शासनाने या स्थितीचा विचार करत शालेय पोषण आहाराबाबत घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शालेय पोषण आहार कर्मचारी कृती समितीने केली. दरम्यान, येथील बी. डी. भालेकर मैदानापासून उपमहापौर गुरुमीत बग्गा, वसुधा कराड, राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली.
मार्गावरून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींनी उपस्थितांशी संवाद साधत पुढील आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली.