दोन हजार चालकांना आजपासून खास प्रशिक्षण

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक फर्स्ट आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी रस्ता सुरक्षा, शालेय बसची सुरक्षित वाहतूक नियमावली या विषयावर गुरुवारपासून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. वर्गात सहभाग न घेणाऱ्या चालकांच्या वाहनांना वाहतूक योग्यतेचे प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी राहुल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात शैक्षणिक संस्था आणि खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लहान-मोठय़ा वाहनांची संख्या जवळपास दोन हजाराच्या घरात आहे. या वाहनांसाठी खास नियमावली शासनाने निश्चित केली आहे. नियमावली अस्तित्वात असली तरी चालकांकडून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एकेका वाहनात क्षमतेहून अधिक विद्यार्थी कोंबण्याचे प्रकार दिसतात. पालक वर्ग या वाहतुकीविषयी वारंवार तक्रारी करतात.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई होत असली तरी त्यास मर्यादा पडतात. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आगामी शैक्षणिक वर्षांत सुरक्षित व्हावी, चालकांनी नियमावलीचे पालन करावे या उद्देशाने नाशिक फर्स्टने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी खास प्रशिक्षण वर्गाची आखणी केली आहे. या वर्गास गुरुवारी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख भरत कळस्कर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होणार आहे.

सध्या सर्व शाळांना सुटी आहे. इतरवेळी चालकांना प्रशिक्षण वर्गासाठी वेळ मिळणे अवघड असते. ही बाब लक्षात घेऊन उन्हाळी सुटीच्या काळात विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आल्याचे नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी सांगितले. प्रशिक्षण न घेणाऱ्यांना इशारा

प्रादेशिक परिवहन विभाग आणि नाशिक फर्स्ट यांच्याकडून चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी मार्गदर्शन केले जाते. वाहतूक परवाना काढण्यासाठी येणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील वाहनधारकांना वाहतूक शिक्षण उद्यान अर्थात ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’ येथील प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांना या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी न होणाऱ्या शालेय वाहतूक करणाऱ्या चालकांना पुढील काळात वाहतूकयोग्य वाहनाच्या प्रमाणपत्रचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.