‘शोध विज्ञानाचा’ विभागस्तरीय प्रदर्शन

कोणत्याही इंधनाशिवाय सौर तसेच पवन ऊर्जेवर चालणारी बोट.. मातीविना तयार झालेला चारा.. शहरात सर्वासाठी डोकेदुखी ठरलेल्या वाहनतळासाठी शोधलेला ‘स्मार्ट’ पर्याय.. पायऱ्यांवरील दबावातून तयार झालेली ऊर्जा.. दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर ‘वर्षां जलसंचय बंधारा’..  या अनोख्या संकल्पनावर आधारित विद्यार्थ्यांच्या मनातील ‘स्मार्ट शहर’ची प्रतिकृती सर्वाच्या उत्सुकतेचा विषय ठरली. निमित्त होते, येथील क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयातातर्फे आयोजित विभागस्तरीय ‘शोध वैज्ञानिकांचा’ या विज्ञान प्रदर्शनाचे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजिलेल्या या प्रदर्शनात नाशिकसह विभागातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘शोध वैज्ञानिकाचा’ या घोषवाक्यानुसार शालेय स्तरावरील इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, भौतीकशास्त्र व रसायनशास्त्रातील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रकल्प, जल संवर्धन -सांडपाणी व्यवस्थापन, हरित तंत्रज्ञान, भविष्यातील ऊर्जेचे स्रोत, प्रदूषण नियंत्रण, टाकाऊ शेतमालापासून उपयुक्त पदार्थनिर्मिती, स्मार्ट सिटी संकल्पना व मूलभूत वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित खेळणी निर्मिती या विषयांवर विविध प्रकल्पांच्या प्रतिकृती तयार केल्या. प्रदर्शनात १०० हून अधिक शाळांमधील २३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सह सचिव एम. व्ही. कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, विश्वस्त डॉ. के. एन. नांदुरकर, प्रा. व्ही. आर. खपली आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित विविध प्रकल्पांची आखणी करतांना नाशिककरांच्या जिव्हाळाचा विषय ठरलेल्या ‘स्मार्टसिटी’ला प्राधान्य दिले. मोकाट जनावरांसाठी मोकळे कुरण, कचऱ्याचे व्यवस्थापन करत ऊर्जानिर्मिती, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सम अंकी गाडय़ांचे नंबर असलेल्या गाडय़ा एकाच दिवशी रस्त्यावर धावतील, ऊर्जा बचतीसाठी पर्यावरणपूरक दिवे, पर्यावरण पूरक शाळा अशा प्रयोगांद्वारे स्मार्ट शहर ही संकल्पना अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मांडली.

निफाड तालुक्यातील चितेगावच्या नूतन विद्यालयाने सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर करीत पाण्यावर चालणारे जहाज तयार केले. जेणेकरून इंधन बचत होऊन पर्यावरण संवर्धन होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जाखोरीच्या आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पायऱ्यांवर व्यक्तीच्या पडणाऱ्या दबावातून तयार होणाऱ्या मानवनिर्मित ऊर्जेकडे लक्ष वेधत नवे उपकरण तयार केले. ग्रामीण भागात यंत्राशिवाय मनुष्यबळाचा वापर करीत प्रकाश कसा निर्माण करता होईल, यावर प्रकल्प तयार केला. नाशिकच्या के. जे. मेहता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘हायड्रोनिक फुडर’ तत्त्वावर आधारित ‘मातीविना केवळ पाण्यावर चारानिर्मिती’ प्रकल्प तयार केला. त्यात वर्षांचे ३६५ दिवस चारा निर्माण करीत चारा टंचाईवर पर्याय शोधला आहे.

नर्गिस कन्या विद्यालयाने राज्यात भेडसावणाऱ्या दुष्काळावर पर्याय शोधणारा ‘वर्षां जलसंचयन बंधारा’चा प्रकल्प मांडला. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहुमजली फिरते वाहनतळ, असे आविष्कार सादर झाले. गुरुवापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारोप सोहळ्यात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल.