प्रारंभी खऱ्या मुद्राकांची चोरी करून नंतर थेट बनावट मुद्रांक छपाई करण्यापर्यंत मजल गाठत देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या अब्दुल करीम तेलगीला हे सहज शक्य झाले ते, नाशिकरोडच्या प्रेसमधून बाहेर आलेल्या छपाई यंत्रामुळे. रेल्वे वॅगनमधून खऱ्या मुद्रांकाची चोरी असो की, भारत प्रतिभृती मुद्रणालयातील छपाईयंत्र भंगारात खरेदी करण्याचा विषय असो. प्रत्येक टप्प्यावर शासकीय यंत्रणेतील काही घटकांनी त्याला सक्रिय योगदान देत आपले उखळ पांढरे करून घेतले.

अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील नाशिकरोडच्या भारत प्रतिभृती मुद्रणालयात मुद्रांकांची छपाई केली जाते. छपाई केलेले हे मुद्रांक व्ॉगनद्वारे रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात देशभरात वितरित केले जातात. ही बाब तेलगीने हेरली. रेल्वे पोलिसांना हाताशी धरून या वॅगन कधी निघतात, कुठे जातात याची तपशीलवार माहिती तो मिळवू लागला. बंदोबस्तात असणाऱ्या व्ॉगनमधून खरे मुद्रांक चोरीला जाऊ लागले. जवळपास चार वर्षे तेलगीने साथीदारांमार्फत हे उद्योग केले. त्यातून मिळणारा पैसा लक्षात घेत तेलगीने मग बनावट मुद्रांक छपाईचा मनसुबा प्रत्यक्षात आणला. कोटय़वधी रुपयांचे बनावट मुद्रांक ज्या यंत्रावर छापले, ते यंत्रच नाशिकरोडच्या भारत प्रतिभृती मुद्रणालयातून मिळवले. या मुद्रणालयातील जुने झालेले छपाईयंत्र भंगारात काढताना त्याचा कुठेही वापरच करता येणार नाही, अशा पद्धतीने विक्री केली जाते. मुद्रणालयातील असेच एक छपाईयंत्र जुनाट झाल्याचे दाखवून तसे काही बदल न करता तेलगीने मिळविले होते. अर्थात त्याला मुद्रणालयातील तत्कालीन महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे समोर आले. या छपाईयंत्राच्या आधारे हुबेहूब बनावट मुद्रांकांची छपाई तेलगीला शक्य झाल्याचे मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मुद्रणालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. त्यातील दोषींवर कारवाई करण्यात आली.

या घडामोडींनी भारत प्रतिभृती मुद्रणालयातील सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा समोर आल्या. निवृत्त लष्करी संघटनेकडे असणारी सुरक्षेची जबाबदारी काढून घेण्यात आली. भारत व चलार्थ या दोन्ही मुद्रणालयात तातडीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी व जवान तैनात करण्यात आले. मुद्रणालयातून भंगारात व अन्य कोणत्याही मार्गाने महत्त्वाचे साहित्य बाहेर जाणार नाही, याकरिता कडेकोट तटबंदी केली गेली. छपाई प्रक्रियेतून शिल्लक राहिलेल्या टाकाऊ सामग्रीची मुद्रणालयात विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे व्ॉगनमधून खरे मुद्रांक चोरीला साहाय्य करीत तेलगीशी घनिष्ठ संबंध राखणाऱ्या रेल्वेचे तत्कालीन अधिकारी राम पवार याच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट मुद्रांकाच्या शोध मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अनिल देशमुख यांनीही तेलगीला मदत होईल, असे प्रयत्न केले होते. देशमुख यांच्या पथकाने सातपूरच्या महादेववाडी येथे सिंग ऊर्फ बंगाली याच्या बंगल्यात छापा टाकला होता. तेव्हा या घरात बनावट मुद्रांक नसल्याचे म्हटले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी राज्य गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बंगालीच्या घरातून ५८ लाखांचे बनावट मुद्रांक जप्त केले. बंगाली व तेलगीला मदत करून स्वत:चे चांगभले करणाऱ्या देशमुख यांच्यासह दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना बडतर्फ करण्यात आले.

बनावट मुद्रांक घोटाळ्याचा तपास सुरू झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती देशभर पसरल्याचे निदर्शनास आले. बनावट मुद्रांक प्रकरणात तेलगी व त्याच्या साथीदारांविरुद्ध नाशिक येथे गुन्हा दाखल झाला. त्या प्रकरणात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. तेलगीशी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचेही नाव जोडले गेले. काँग्रेस आघाडीच्या काळात तेव्हा भुजबळ राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळत होते. धुळे-जळगावमधील इंधन भेसळीतील सूत्रधार अंतिम तोतलाने भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळशी भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. तोतला हा गोटे व तेलगीचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले गेले. तेलगी प्रकरणात आ. अनिल गोटे यांना अटक झाली होती. सुमारे चार वर्षे ते कारागृहात होते. उपरोक्त कथित गाठीभेटीमुळे छगन भुजबळ यांच्यावरही तेलगीशी संबंध असल्याचे आरोप झाल्याचा इतिहास आहे.

मुंबईतील बडदास्त कर्नाटक पोलिसांमुळे उघड!

मुंबई : मुंबई असो वा बंगळुरू, पोलिसांच्या ताब्यात असतानाही बनावट मुद्रांक घोटाळ्यात शिक्षा झालेल्या अब्दुल करीम तेलगीची बडदास्त ठेवली जात होती. मुंबईत तर कर्नाटक पोलिसांच्या चौकशी पथकाचे अधिकारी श्रीकुमार यांच्यामुळे तेलगीचे पुरविण्यात येणारे चोचले उघड झाले होते व त्यातूनच पुढे राजकारणी आणि पोलिसांची कशी मदत होते हे वास्तव समोर आले.

मुद्रांक घोटाळ्यात ३० वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या तेलगीचे गुरुवारी बंगळुरूमध्ये निधन झाले. बंगळुरूच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या तेलगीला चांगल्या सुविधा पुरविण्यात आल्याचा आरोप पोलीस उपमहानिरीक्षक डी. रुपा यांनी  मध्यंतरी केला होता. तेलगी आणि अण्णा द्रमुकच्या शशिकला या दोघांना चांगल्या सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप करणाऱ्या रुपा यांची कर्नाटक सरकारने बदली केली होती.

बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यावर मुंबई पोलिसांनी तेलगीला अटक केली होती. तेव्हा मुंबई पोलिसांकडे तेलगीचा ताबा होता. तुरुंगात ठेवण्याऐवजी तेलगी ७, कफ परेड रोड या इमारतीतीत त्याच्या सदनिकेत राहात असल्याची तक्रार आली होती. कर्नाटक सरकारने नेमलेल्या चौकशी पथकाचे प्रमुख श्रीकुमार हे खातरजमा करण्याकरिता या इमाततीत गेले होते. घराची बेल वाजविली असता बंदोबस्तावरील पोलिसाने दरवाजा उघडला होता. तेव्हा तेलगी चहा व बिस्किटे खात शयनगृहात बसला होता. श्रीकुमार यांनी ही बाब महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली. बंदोबस्तावरील पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय तेलगीची एवढी बडदास्त राखली जाणे शक्यच नव्हते.

तेलगी घोटाळ्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रणजितसिंग शर्मा, सहआयुक्त (गुन्हे) श्रीधर वगळ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली होती. येरवडा कारागृह पोलिसांनीच भरून जाईल, असे तेव्हा चेष्टेने बोलले जायचे. तुरुंगात असताना या घोटाळ्यातील आरोपी पोलिसांमध्ये माऱ्यामाऱ्या झाल्या होत्या. काकडे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. काकडे यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तेव्हा झाला होता.

घोटाळा उघड झाल्यावर सरकारी अधिकारी, पोलीस आणि राजकारण्यांना अटक झाली. पण मुद्रांक छापतात तेथील सिक्यूरिटी प्रेसच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात काहीच कारवाई झाली नव्हती. यावरून आरडाओरड होताच सरकारी प्रेसच्या अधिकाऱ्यांनाही अटक झाली होती.

पोलीस अधिकाऱ्यांचे हेवेदावे

तेलगी घोटाळ्यानंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापसातील वादात जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न  केला. मुंबई पोलीस आयुक्तपदावर डोळा असणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा बराच पुढाकार होता, असे समजते. राजकारणी, पोलीस आणि नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांबरोबरच तेलगीचा वकील रशिद कुलकर्णी यालाही बंगळुरूमधून मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या कुलकर्णी यांच्या अटकेचे मोठे नाटय़ झाले होते.