नाशिक रोड भागातील घटना

नाशिक रोड येथील वास्को चौकात दुकानाजवळ गुरुवारी पहाटे रोकडोबावाडीत राहणाऱ्या ४२ वर्षांच्या भंगार विक्रेत्याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वास्को चौकातील भंडारी प्लायवूडजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक रोड पोलिसांनी जखमीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू दोंदे हा रोकडोबावाडीत पत्नीसह राहत होता. दीड महिन्यापासून भंगार गोळा करत, कधी पुठ्ठा गोळा करत मिळेल जिथे जमेल त्या जागेवर तो झोपत होता. काही वेळा मजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. काही दिवसांपूर्वी त्याने आंबेडकर रोड परिसरात चप्पलचे दुकान भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतले होते. त्याला दारूचेही व्यसन होते. गुरुवारी पहाटे भंगार गोळा करत असताना कोणीतरी दोंदे यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. हा सर्व प्रकार भंगार गोळा करण्याच्या वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.