12 December 2018

News Flash

..तर बेवारस वाहनांचा लिलाव

शहरातील गॅरेज वा तत्सम ठिकाणी अपघातात नुकसान झालेली किवा जुनाट वाहने कित्येक वर्षांपासून पडून आहेत.

नाशिक शहरातील वाहतूक पोलीस शाखेत खितपत पडलेली बेवारस वाहने.

वाहतूक शाखेत १५२ बेवारस वाहने

शहर वाहतूक शाखा कार्यालयात अनेक वर्षांपासून बेवारस दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने पडून असून त्यांची संख्या आता १५२ वर पोहचली आहे. त्यात १२३ दुचाकी, तर २९ चारचाकी, तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे क्रमांक जाहीर करत वाहतूक शाखेने मालकांना ती ओळख पटवून नेण्याचे आवाहन केले आहे. दहा दिवसात ही वाहने मूळ मालकांनी न नेल्यास त्यांचा लिलाव करून ही रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे.

शहरातील गॅरेज वा तत्सम ठिकाणी अपघातात नुकसान झालेली किवा जुनाट वाहने कित्येक वर्षांपासून पडून आहेत. तशीच स्थिती काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यांच्या आवारात पहावयास मिळत होती. एखादा गुन्ह्य़ात अपघातात किंवा  बेवारस आढळलेल्या वाहनांना पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवले जाते. या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर येते. काही कालावधीनंतर एकाच ठिकाणी पडून राहिलेल्या वाहनांची दुरावस्था होते. जागा व्यापली जाते. जुनाट, जीर्ण आणि अपघातग्रस्त वाहनांमुळे परिसराला ओंगाळवाणे रुप प्राप्त होते. वाहतूक पोलीस शाखा कार्यालयाच्या परिसरात याच स्वरुपात दीडशेहून अधिक वाहने पडलेली आहेत. अनेक वर्षांपासून ही वाहने पडून असून त्यांची यादी वाहतूक शाखा कार्यालयात ठेवण्यात आली आहे. या वाहनांमध्ये मोटारसायकल, लुना, स्कूटर, स्कूटी आदींचा समावेश आहे. अपघातग्रस्त रिक्षा मूळ मालकांनी परत नेण्याची तसदी घेतली नाही. परिणामी, अपघातात नुकसान झालेल्या अनेक रिक्षा या ठिकाणी पडून आहेत. इतकेच नव्हे तर, इंडिका, अ‍ॅम्बेसिडर अशीही काही वाहने आहेत. अनेक वाहनांवर क्रमांक असले तरी काही वाहनांवर क्रमांक नाही. बेवारस वाहने नेण्यासाठी मूळ मालक कधीही न फिरकल्याने त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली. वाहतूक शाखेने आता मूळ मालकांना ती घेऊन जाण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे.

अनेक वर्षांपासून बेवारस दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने वाहतूक शाखेच्या आवारात पडून आहेत. या वाहनांची यादी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. बेवारस वाहनांचा पुरावा सादर करून मूळ मालकांनी ती दहा दिवसाच्या आत घेऊन जावी. या मुदतीत वाहने न नेल्यास त्यांचा लिलाव करून ती रक्कम सरकारजमा करण्यात येणार आहे.

फुलदास भोये (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)

First Published on March 9, 2018 2:32 am

Web Title: scrap vehicles auction nashik traffic police