15 December 2017

News Flash

दुबार पेरणीचे संकट टळले

यंदा पावसाच्या हंगामात सुरुवातीला शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली होती.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: August 11, 2017 2:18 AM

इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पावसाने भात पीक चांगल्या अवस्थेत आहेत. 

  • आठ तालुक्यांत १०० टक्क्य़ाहून अधिक पेरणी
  • मक्याच्या क्षेत्रात वाढ, बाजरी, नागलीमध्ये घट

प्रारंभीच्या काळात घोंघावणारे दुबार पेरणीचे संकट मुसळधार पावसाने टळले असून जिल्ह्यतील आठ तालुक्यांमध्ये खरीपाची १०० टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे.  मक्याची लागवड यंदा कमालीची वाढली असून दोन लाख ३१ हजार ८४६ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुसरीकडे बाजरी व नागलीच्या क्षेत्रात घट झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये चांगली स्थिती असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

यंदा पावसाच्या हंगामात सुरुवातीला शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली होती. प्रारंभी हजेरी लावून अंतर्धान पावलेल्या पावसामुळे पेरणी करणारे शेतकरी संकटात सापडले होते. दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी साशंकता असताना जुलैमध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. काही भागात इतका पाऊस झाला की, आधीची कसर भरून निघाली. तुर्तास म्हणजे आठ दिवसांपासून त्याने विश्रांती घेतली आहे. खरीप पीक पेरणीची बहुतांश कामे पूर्णत्वास गेली असून काही भाग केवळ त्यास अपवाद राहिला. नाशिक व दिंडोरी तालुक्यात अनुक्रमे ६६ व ७८ टक्केच पेरणी झाली आहे.

पीकनिहाय विचार केल्यास भाताच्या लागवडीत वाढ झाली. त्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार ७४९ इतके असून आतापर्यंत ७२ हजार ६८६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ज्वारीच्या लागवडीत काहीअंशी वाढ झाली. जिल्ह्यत ज्वारीची ५६ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी (सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार ९०), नागली २४ हजार २५४ (३५ हजार ३५७ हेक्टर), इतर तृणधान्य ९७ हजार ६१०० (१३ हजार ६४३ हेक्टर क्षेत्र) पेरणी झाली आहे.

तृणधान्याच्या एकूण पेरणीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. इतर पिकांमध्ये तूर १०२९५ हेक्टर (१०४७८ हेक्टर), उडीद ११३१५ (१४७९७), मूग १०४७२ (१०३३९३), इतर कडधान्य ३४२१० (१०००९) तसेच एकूण अन्नधान्याची प्रत्यक्षात चार लाख ९५ हजार ७९८ क्षेत्रावर लागवड झाली आहे. या व्यतिरिक्त भुईमूग २५४४३, सूर्यफूल ८००, सोयाबीन ६७४२२, खुरसणी ८३४२, इतर गळित धान्य १७० हेक्टर अशी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

तालुक्यांची टक्केवारी

विशेष म्हणजे, इतर भागांच्या तुलनेत पावसाचे जेमतेम प्रमाण राहिलेल्या काही तालुक्यात खरिपाची १०० टक्क्याहून अधिक पेरणी झाली. त्यात मालेगाव १०३.७७, नांदगाव १००, येवला १२६, सिन्नर १०४ आणि चांदवड तालुक्यात १००.१३ टक्के या तालुक्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त सटाणा १००.०३, देवळा ११८.६७, त्र्यंबकेश्वर १०३.६९ टक्के पेरणी झाली. कळवण (९६.१६), दिंडोरी (७८.४९) सुरगाणा (९०.५२), नाशिक (६६.४३), इगतपुरी (७१.२५), पेठ (८७.८०), निफाड (९२.८४) अशी पेरणीची टक्केवारी आहे.

First Published on August 11, 2017 2:18 am

Web Title: second issue monsoon farming