28 February 2020

News Flash

गंगापूर धरण सुरक्षेत वाढ

नाशिककरांची तृष्णा भागविणारे हे धरण वेगळ्याच कारणांनी पुन्हा एकदा चर्चेत आले.

गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या जनजागृतीसाठी लावलेले फलक.

कायमस्वरूपी बंदोबस्त; सीसीटीव्हीची क्षमता वृद्धिंगत; परवानगीशिवाय येणाऱ्यांना मनाई

नाशिक : काठोकाठ भरण्याच्या मार्गावर असलेल्या गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कायमस्वरुपी बंदोबस्त तैनात करत परिसरात रात्रीची गस्तही वाढविली आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभाग धरणाच्या विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी अस्तित्वातील सीसी टीव्ही यंत्रणेची क्षमता वृद्धिंगत करत आहे. त्या अंतर्गत धरण परिसरात लवकरच नव्याने आठ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी गंगापूर धरण उडवून देण्याची धमकी दूरध्वनीवरून दिली गेल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तेव्हा तो दूरध्वनी परभणी येथून एका ट्रॅक्टरचालकाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधिताने आपण भ्रमणध्वनी केला नसल्याचे यंत्रणेला सांगितले. या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर आहे.

नाशिककरांची तृष्णा भागविणारे हे धरण वेगळ्याच कारणांनी पुन्हा एकदा चर्चेत आले. या पाश्र्वभूमीवर, पोलीस, पाटबंधारे विभागाकडून धरणाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वास्तविक, कोणतेही धरण पर्यटकांना आकर्षित करते. गंगापूरसह इतरही धरणाच्या परिसरात प्रवेश करण्यास अभ्यागतांना प्रतिबंध आहे.

धरणास भेट देण्यासाठी पाटबंधारे विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. तथापि, हे ज्ञात नसल्याने अनेक पर्यटक वाहनाने अवघ्या २५ ते ३० मिनिटांत गाठता येणाऱ्या गंगापूर धरण परिसरात पोहचतात. शनिवार, रविवार हे सुट्टीचे दोन दिवस हा परिसर पर्यटकांनी फुलून जातो. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी न घेणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणापर्यंत धाव घेणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

धरण परिसरात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते असून महाविद्यालयीन युवक, जोडपी, नाशिक-गिरणारे या मुख्य रस्त्याऐवजी गोवर्धन गावापासून फारशी वर्दळ नसलेल्या सावरगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. धरणाकडे येणाऱ्या भागात पाटबंधारे विभागाने प्रवेशद्वार उभारून प्रवेशास प्रतिबंध केला आहे. धरण परिसरात यापूर्वी पाण्यात बुडून काही दुर्घटना घडलेल्या आहेत.

यामुळे या भागात ‘सेल्फी काढू नये’, ‘पाण्यात उतरू नये’, असे फलकही नव्याने उभारण्यात आले आहेत. पाटबंधारे विभागाचे काही कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतात. त्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. धरण सुरक्षिततेसाठी काही वर्षांपूर्वी ११ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील अनेक कॅमेरे बंद असल्याने धरण परिसरावर नजर ठेवण्यास मर्यादा आल्या. हे कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी पोलिसांकडून होणारी मागणी पाटबंधारे विभागाने मान्य केली आहे. नवीन आठ कॅमेरे बसवून अस्तित्वातील सीसी टीव्ही यंत्रणेची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या माध्यमातून अनधिकृतपणे धरण परिसरात प्रवेश करणाऱ्यांवर नजर ठेवणे सुकर होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात करत परिसरात रात्रीची गस्त वाढविली आहे.

गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने धरणावरील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी बंद पडलेले सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, याकरिता पोलीस यंत्रणा वारंवार पत्र व्यवहार करीत आहे. पाटबंधारे विभागाने सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. 

      – बी. बी. ठोंबे , पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे

गंगापूर धरणावर काही वर्षांपूर्वी ११ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील काही कॅमेरे नादुरुस्त झाले. धरण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी आता नव्याने आठ अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवीन आणि कार्यान्वित असणारे जुने अशा एकूण १५ ते २० कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्थेची फळी मजबूत करण्यात येणार आहे. धरण परिसरात कोणी सेल्फी काढू नये वा पाण्यात उतरू नये म्हणून नव्याने फलक बसविण्यात आले आहे. 

      – आर. एस. शिंदे , कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

First Published on July 31, 2018 2:06 am

Web Title: security of gangapur dam increased
Next Stories
1 ..तर योगेश घोलप यांचा राज्यपालांकडे राजीनामा
2 रिक्षाचालकाची बांधकाम व्यावसायिकास मारहाण
3 ११ हजार टन कांदा खरेदी करूनही भाव अस्थिरच
Just Now!
X