शिक्षण विश्व परिसंवादात तुकाराम मुंढे यांचे मार्गदर्शन

नवीन पिढी शिक्षणाकडे केवळ पैसा देणारे माध्यम म्हणून पाहते. पैसा हे शिक्षणाचे अंतिम ध्येय नसावे, तर व्यक्तीला आनंद देणारे, स्वत:सह कुटुंब, समाजाला उपयुक्त ठरेल, असे शिक्षण महत्त्वाचे आहे. यामुळे केवळ गुण आणि पदव्या देणारे शिक्षण घेऊ नका, तर स्वानंद देणाऱ्या करिअरची वाट निवडा, असा सल्ला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

येथील कॉलेज रोड, गंगापूर रोड वाणी मित्रमंडळातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘शिक्षणविश्व २०१८’ शैक्षणिक परिसंवादात मुंढे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मळलेल्या वाटा सोडून आपला कल, आवड ओळखून शिक्षण घ्यावे. सवयीतून कार्य संस्कृती आणि चारित्र्य निर्माण होते. माहितीचा डोंगर म्हणजे ज्ञान नसून माहितीवर प्रक्रिया करून जे तयार होते ते ज्ञान असते. असे ज्ञान मिळवणारी पिढी तयार व्हावी, अशी अपेक्षा मुंढे यांनी व्यक्त केली. शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांनी शिक्षणाने उद्योजकता वाढल्याचे सांगून सात दशकांतील स्थित्यंतराचा आढावा घेतला. बडोदा विभागाचे जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त उन्मेश वाघ यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यापूर्वी चांगला सल्ला घ्यावा, त्यासाठी शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे आणि आपल्या क्षेत्रात बुद्धिमत्ता ओळखून उपजत कौशल्य आणि कलागुणांना ओळखून शिक्षणक्षेत्र निवडले तर यश हमखास मिळते, असे सांगितले. दिलीपकुमार औटी यांनी तरुणाई समस्यांवर लक्ष केंद्रित करत, मात्र ते समस्याच्या निराकरणावर केंद्रित केल्यास आणि चिकाटी, सर्मपण आणि एकाग्र वृत्तीने यशाचे शिखर दूर नाही याकडे लक्ष वेधले. यावेळी वेदांत देव आणि अनुजा टिपरे यांचा सत्कार करण्यात आला. वाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष योगेश मालपुरे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले. तसेच मंडळ स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या गरजवंत हुशार विद्यार्थ्यांची शिक्षणाचा आर्थिक भार या संस्थेने उचलला आहे.