21 September 2020

News Flash

इटलीतील चित्रपट महोत्सवासाठी नाशिकच्या ‘ताजमाल’ ची निवड

जगभरातून १६५० प्रवेशिकांमधून मराठी चित्रपटाची निवड

नाशिकची निर्मिती असलेल्या ‘ताजमाल’ या चित्रपटातील चित्रीकरणप्रसंगी दिग्दर्शक नियाज मुजावर हे अभिनेते संजय खापरे यांना प्रसंग समजावून सांगताना

जगभरातून १६५० प्रवेशिकांमधून मराठी चित्रपटाची निवड

नाशिक : मराठीसह हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये नाशिकने अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य अशा अनेक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यामुळे चित्रपट, नाटय़ आणि सांस्कृतिकमध्ये नाशिकचे नाव गाजत असून त्यात  डॉ. कुलभूषण मंगळे आणि डॉ. मनोज कदम यांची निर्मिती असलेल्या ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटाची भर पडली आहे. इटलीच्या ट्रेनटो शहरात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या २३ व्या ‘रिलीजन टूडे’  चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे.

महोत्सवात ‘ताजमाल’ या चित्रपटाला मुख्य परीक्षक गटाअंतर्गत सर्वोतम चित्रपट आणि ‘इन दी स्पिरीट ऑफ पीस’ या पुरस्कारासाठी नामांकने प्राप्त झाली आहेत. जगभरातून १६५० चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी दाखल झाल्या. त्यातून मराठी चित्रपटाची निवड होणे ही मराठी भाषेसाठी तसेच मराठी आणि भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत मानाची बाब आहे. ‘ताजमाल’ हा चित्रपट अस्तित्वात असणाऱ्या रूढी, चालीरीतींवर अत्यंत डोळस आणि सजगपणे भाष्य करतो. चित्रपटात प्रमुख भूमिकेत संजय खापरे , शशांक शेंडे , विजय निकम हे वरिष्ठ कलाकार असून सोबत विनायक पोतदार,  किरण खोजे, नामदेव मुरकुटे आणि अर्पिता घोगरदरे यांनी देखील भूमिका पार पाडल्या आहेत. अभिनयासोबतच या चित्रपटाची तांत्रिक बाजूदेखील अत्यंत समर्थ तंत्रज्ञाच्या हाती आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायालेखक हरी नायर यांनी या चित्रपटाची छायांकनाची बाजू सांभाळली आहे. संगीत आणि पाश्र्वसंगीताची जबाबदारी शशांक पोवार यांनी सांभाळली आहे.

लेखक, दिग्दर्शक नियाज मुजावर यांचा हा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी डिस्को सन्या हा  चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मुजावर यांनी यावर्षीच्या पिफ २०२० (पुणे महोत्सव ) सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार देखील प्राप्त केला आहे. ताजमाल ही एका मराठी शेतमजुराच्या कुटुंबाची गोष्ट आहे . कुटुंबप्रमुख स्वत:च्या कुटुंबाच्या भल्यासाठी त्यांच्या विरोधात जाऊन कृत्य करतो. ज्यामुळे हे कुटुंब अडचणीत येते. जेव्हा स्वत:च्या कृत्याची उपरती कुटुंबप्रमुखाला होते, तेव्हा कशा प्रकारे संपूर्ण कुटुंब एकत्र येते, याची कथा ताजमालमध्ये दाखविण्यात आली असल्याचे मुजावर यांनी सांगितले. चित्रपटात कुटुंबप्रमुखाची भूमिका संजय खापरे या अनुभवी कलाकाराने साकारली आहे. खापरे यांनी शेतमजुराची भूमिका साकारण्यासाठी स्वत:च्या शरीरात आमूलाग्र बदल घडवून आणले.

नाशिकचे डॉ. कुलभूषण मंगळे आणि डॉ. मनोज कदम यांची ही पहिलीच निर्मिती. तद्दन व्यावसायिक विचार न करता निर्मितीसाठी सकस आशय आणि अभिव्यक्ती असणाऱ्या ताजमालची निवड त्यांनी केली. करोनाने अतिशय त्रासलेल्या इटलीतली शहरे आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, २३ वा रिलीजन टूडे हा महोत्सव संपूर्ण जगाला कलेच्या माध्यमातून एकत्र करण्यासाठी इटलीतल्या निसर्गरम्य ट्रेनटो शहरात होत आहे. नाशिकची निर्मिती असल्याने नाशिककर चित्रप्रेमींना ताजमालकडून अधिक अपेक्षा आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 2:39 am

Web Title: selection of marathi movie tajmal from nashik for film festival in italy zws 70
Next Stories
1 कारसेवकांच्या सन्मान सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली
2 नाशिकमध्ये करोना संशयित महिलेचा मृत्यू; नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
3 वाढीव वीज देयकांविरोधात पदयात्रा
Just Now!
X