‘करोना’चा संसर्ग देशपातळीवर वाढत असताना अनेकांच्या हातातील काम सुटले. कामधंदा बुडाल्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी बहुतेकांनी स्वयंरोजगाराची वाट धरली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे या काळात स्वयंरोजगारासाठी अधिक प्रस्ताव आले आहेत. कृषिपूरक व्यवसाय, सेवा क्षेत्र तसेच उत्पादन क्षेत्राकडे अनेकांचा कल आहे.

मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. हा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात अनेकांच्या हातातील काम सुटले. काहींना कामावरून कमी करण्याची धमकी देत पगार कपात करण्यास सुरुवात केली. हे अर्थचक्र भेदण्यासाठी काहींनी स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला. येथील अण्णाभाऊ पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे करोनानंतरच्या काळात कर्जाची विचारणा होण्यास सुरुवात झाली. मागील वर्षांच्या तुलनेत कर्ज विचारणाऱ्यांची संख्या वाढली असून प्रस्तावही वाढले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकासच्या साहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली. चालू वर्षांत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प योजनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची वाट धुंडाळली जात आहे.

नाशिक जिल्ह्य़ात शहरी आणि ग्रामीण अशी संमिश्र वस्ती आहे. त्यानुसार जिल्हा परिसरातून कृषिपूरक व्यवसायाकडे अधिक जणांची ओढ आहे.

त्यातही दुग्ध व्यवसाय, बी-बियाणे, शेती अवजारे, कुक्कटपालन, शेळीपालन, शेतीशी संबंधित वाहने खरेदी करण्यासाठी अनेकांनी अर्ज केले. याशिवाय उत्पादन तसेच सेवा क्षेत्राविषयी मोठय़ा प्रमाणावर अर्ज आले आहेत. यंदा चालू वर्षांत पात्रता प्रमाणपत्रासाठी ९७४ अर्ज आले. प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ४०२ कर्ज परताव्याची प्रकरणे मंजूर झाली आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत वैयक्तिक व्याज परताव्यात नऊ कोटी, ७१ लाख, २९ हजार ७२ रुपये वितरित झाले आहेत. गट कर्ज परताव्यात नऊ लाख, ४१ हजार २९४ परतावा देण्यात आल्याची माहिती तडवी यांनी दिली.