करोना काळात राज्यातील काही महाविद्यालयांची वसतिगृहे रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून जिल्हानिहाय आढावा घेऊन राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू करण्याचा निर्णय होणार असल्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा लाभ देशातील मराठी भाषिकांना घेता यावा म्हणून गोव्यात प्रायोगिक तत्त्वावर सुविधा उपलब्ध केली जात आहे. तसेच चंदगड, उमडी आणि म्हैसाळ या सीमावर्ती भागातील गावांमध्ये मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राचे काम आणि मुक्त विद्यापीठाचा राज्यात अधिकाधिक विस्तार करण्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी मध्यंतरी पुणे विद्यापीठाने कोणतीही प्रक्रिया न करता वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले. उच्च शिक्षण विभागाने विचारणा केल्यावर विद्यापीठाने तो निर्णय मागे घेतला. मुळात महाविद्यालये सुरू करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून त्या अनुषंगाने लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

मुक्त विद्यापीठाचा राज्यात विस्तार करण्यासाठी पुणे उपकेंद्राचे रखडलेले काम, मुंबईत स्वत:च्या इमारतीत उपकेंद्र, रायगड-ठाण्यासाठी एक आणि गोवा-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी एक तसेच नागपूरच्या उपकेंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठाचा ‘बीएस्सी कृषी’ अभ्यासक्र म विद्यापीठ अनुदान आयोगाने बंद केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना तो शिक्षणक्रम करता यावा म्हणून राज्य शासनामार्फत तो सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देशातील ज्या मोठय़ा शहरांमध्ये मराठी भाषिक आहेत, त्यांना मुक्त विद्यापीठाचे दालन खुले करण्याचा प्रयत्न आहे. मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा

वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सामंत यांनी नमूद केले. ऑनलाइन परीक्षेतील गोंधळाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर कोण दोषी आहेत याची स्पष्टता होईल. पुणे विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचे बांधकाम एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर असल्याचे सामंत यांनी नमूद केले.

‘कॅस’बाबत तक्रारींचे कुलगुरूंच्या स्तरावर निराकरण

* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदावर बढती देण्याच्या ‘कॅस’ प्रक्रियेविषयी अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. मुक्त विद्यापीठाच्या पीएच. डी बाबत या प्रक्रियेत परस्परविरोधी निकष लावण्यात आल्याचे उघड झाले आहे.

* या संदर्भात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार प्राध्यापकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत. या संदर्भात कुलगुरू दोन दिवसांत बैठक घेऊन संबंधित प्राध्यापकांच्या तक्रारींचे निराकरण करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.