28 May 2020

News Flash

ज्येष्ठ संघ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन

दीक्षित हे नाशिकमधील संघाचे सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक होते. ६६ वर्षे त्यांनी संघ कार्यासाठी दिली.

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे माजी संघटन मंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने येथील श्री गुरुजी रुग्णालयात निधन झाले. दीक्षित यांच्यावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दीक्षित यांना आदरांजली वाहण्यासाठी ७ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता शंकराचार्य न्यास येथील नानासाहेब ढोबळे सभागृहात श्रद्धांजली सभा होणार आहे.

दीक्षित हे नाशिकमधील संघाचे सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक होते. ६६ वर्षे त्यांनी संघ कार्यासाठी दिली. मुंबईतील दादर भागात संघाच्या संपर्कात आल्यानंतर १९५४ मध्ये बाळासाहेबांनी संघ प्रचारक म्हणून कामास सुरुवात केली. सुरुवातीला पंढरपूर, बार्शी या भागात त्यांनी कार्य केले. त्यानंतर १९५६ ते १९७३ अशी १७ वर्षे ते धाराशिव जिल्ह्य़ात प्रचारक म्हणून कार्यरत राहिले. काही वर्षे त्यांनी रायगड, मुंबई या जिल्ह्य़ांत संघाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणीबाणीच्या काळात त्यांना कारावासात जावे लागले. आणीबाणीनंतर बाळासाहेब यांच्याकडे वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताची जबाबदारी आली. वनवासी कल्याण आश्रमाची घटना तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष वनवासी भागात प्रकल्प उभे करण्याचे कार्य बाळासाहेबांनी केले. महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री,  क्षेत्र संघटनमंत्री, पूर्णवेळ कार्यकर्ता प्रमुख, अखिल भारतीय छात्रावास प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही वर्षांंपासून बाळासाहेबांचा निवास नाशिक येथील कल्याण आश्रमाच्या कार्यालयातच होता.  काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले.  अंत्यसंस्कारास वनवासी कल्याण आश्रम तसेच संघ आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते  उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 3:07 am

Web Title: senior rss campaigner balasaheb dixit passes away zws 70
Next Stories
1 महाविकास आघाडीविरोधात भाजपचे आंदोलन
2 स्थायी सदस्य निवडीवरून असंतोष
3 देहविक्री व्यवसायातील महिलांची ‘वेगळी वाट’ 
Just Now!
X