30 September 2020

News Flash

कान्हेरे मैदानावर धावणे, सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका

वास्तूशास्त्रज्ञ धनंजय शिंदे यांनी कान्हेरे मैदानाच्या नूतनीकरणासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

शासनाकडून पाच कोटींचा निधी

सायकलचे शहर अशी नवीन ओळख धारण करण्याच्या मार्गावर असलेल्या नाशिकमध्ये त्या अनुषंगाने सुविधांची उपलब्धता करण्याचे काम सुरू झाले आहे. त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अस्तित्वातील धावण्याच्या मार्गाचे नूतनीकरण आणि सायकलसाठी खास मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला शासनाने मान्यता देत आपल्या हिश्याचा पाच कोटींचा निधी वर्ग केला आहे.

या बाबतची माहिती आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. कान्हेरे मैदान नूतनीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमोर करण्यात आले. या कामासाठी मूलभूत सुविधा योजनेंतर्गत निधीची व्यवस्था करण्यात आली. या प्रकल्पास मान्यता मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. शासनाने ५० टक्के निधी शासनाचा, तर ५० टक्के निधी महानगरपालिकेचा या तत्वावर मान्यता दिली. शासनाने आपल्या हिश्याचा पाच कोटीचा निधी वर्ग केला आहे.

पालिकेचे वास्तूशास्त्रज्ञ धनंजय शिंदे यांनी कान्हेरे मैदानाच्या नूतनीकरणासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात ५८८ मीटरचा धावण्याचा मार्ग तसेच सायकलसाठी ४७८ मीटरची मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गामध्ये साधारणत: सहा फूटाचे अंतर राहील. धावण्याचा मार्ग ‘सिंथेटिक ट्रॅक’ प्रमाणे करण्यात येणार होता. परंतु, या स्वरुपाचा मार्ग धावण्याच्या स्पर्धेतील क्रीडापटूंसाठी योग्य ठरतो. दैनंदिन चालणे, धावणे यासाठी त्याची गरज भासत नाही. सिंथेटिक ट्रॅकचा देखभाल खर्च अधिक असतो. त्यामुळे कालांतराने त्याची योग्य निगा राखणे अवघड ठरते. असे काही मुद्दे चर्चेत उपस्थित झाल्यानंतर सिंथेटिक ट्रॅकऐवजी हिरवळीचा समावेश करून धावण्याचा मार्ग करण्याचे निश्चित झाले. या प्रकल्पांतर्गत उपरोक्त सुविधांसह आधुनिक ग्रीन जिम, प्रसाधनगृह आदींची उपलब्धता करण्यात येणार आहे. नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. प्रत्यक्ष मैदानावर भेट देऊन स्थितीचे अवलोकन केले जाईल. विक्रमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे.

लवकरच सार्वजनिक सायकल सेवा

नाशिकमध्ये सायकलप्रेमींची संख्या लक्षणीय आहे. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या प्रयत्नामुळे सायकलपटू देश-विदेशातील स्पर्धामध्ये सहभागी होत आहेत. महापालिकेने या वर्षांत वेगवेगळ्या भागात सायकल मार्गिका विकसित करण्याचे निश्चित केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह नव्याने होणाऱ्या रस्त्यांवर सायकल मार्गिका करण्याचे प्रस्तावित आहे. इतकेच नव्हे तर, सायकलचा वापर वाढावा, यासाठी पीपीपी तत्वावर फुलोरा फाऊंडेशनच्या मदतीने महापालिका सार्वजनिक सायकल सुविधा उपलब्ध करीत आहे. अलिकडेच झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत प्रारंभी २०० सायकल  उपलब्ध करण्याचे निश्चित झाले. या व्यवस्थेसाठी ठिकाणे निवडण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने विद्यार्थी, नागरिकांची भिस्त रिक्षावर आहे. या स्थितीत सायकलचा पर्याय त्यांना दिलासा देणारा ठरू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 3:21 am

Web Title: separate line for running and cycling in kanhere maidan in nashik
Next Stories
1 बोलण्याच्या नादात रक्कम लंपास
2 ‘व्यवस्थेला प्रश्न विचारणारे देशद्रोही कसे?’
3 उद्योजकाच्या अभियंता मुलाची नाशिकमध्ये आत्महत्या
Just Now!
X