जुलैच्या पहिल्या सप्ताहातदेखील पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने जिल्ह्य़ात टंचाईसह पेरण्या रखडण्याचे संकट उभे ठाकले आहे. या हंगामात आतापर्यंत जिल्ह्य़ात २३६८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गेल्या वर्षी यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. इगतपुरी, पेठ हे दोन तालुके वगळता कुठेही दमदार पाऊस नाही. सुरगाणा, नाशिक, येवला या ठिकाणी तुलनेत बरी स्थिती आहे. उर्वरित तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यात कळवण, देवळा, चांदवड, नांदगाव अणि दिंडोरीत बिकट स्थिती आहे.

ऐन पावसाळ्यात शेकडो गावांना अद्यापही टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यंदा पाऊस गेल्या वर्षीचा कित्ता गिरवत आहे. गतवर्षी प्रारंभी महिनाभरातच तो अंतर्धान पावला होता. नंतर दमदार स्वरुपात त्याचे आगमन झाले. परंतु, अखेरच्या टप्प्यात तो पुन्हा गायब झाला. एक जून ते चार जुलै २०१९ या कालावधीत जिल्ह्य़ात २३६८ मिलिमीटरची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २०० मिलीमीटरने कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५६८ मिलिमीटर पाऊस झाला होता.

आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ६०३ मिलिमीटर पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली आहे. त्या खालोखाल पेठचा (४८७ मिलिमीटर) क्रमांक आहे. या दोन तालुक्यांसह नाशिक, सुरगाणावगळता उर्वरित तालुक्यात २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद नाही. नाशिकमध्ये २१२, सुरगाणा २३२, येवला १९५, त्र्यंबकेश्वर १२७, येवला १९५, मालेगाव ११५ मिलिमीटर असा पाऊस झाला आहे. १०० मिलिमीटर पाऊस न झालेले आठ तालुके आहेत. त्यामध्ये दिंडोरी ६०, नांदगाव ४७, चांदवड ३४, कळवण पाच, बागलाण ९३, देवळा २५, निफाड ४८, सिन्नर ८२ मिलिमीटर यांचा समावेश आहे.

पाणीटंचाई कायम, पेरणी रखडली

एक जून ते चार जुलै २०१८ या कालावधीत जिल्ह्य़ात २५७७ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण घसरून २३६८ मिलिमीटरवर आले आहे. मागील वर्षी पाऊस चार ते पाच तालुक्यांपुरताच मर्यादित राहिला होता. यंदाही त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. इगतपुरी, पेठवगळता इतरत्र दमदार स्वरुपात पाऊसच झाला नाही. तीन-चार तालुक्यात बऱ्यापैकी स्थिती असली तरी आठ तालुके दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट कायम असून पेरणी रखडली आहे.

नाशिकसह इगतपुरी आणि पेठचा अपवाद वगळता इतरत्र समाधानकारक पाऊस नाही. देवळा तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेली कामे, तसेच नदी, नाले, धरणे पावसाची प्रतिक्षा करीत आहेत.

(छाया- महेश सोनकुळे)