रविवापर्यंत बँकाही बंद

मालेगाव : शहरात आतापर्यंत ३६ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता शहरात टाळेबंदीची अमलबजावणी अधिक कठोरपणे होण्यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. करोना रुग्ण आढळून आलेले सात क्षेत्र पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत. तसेच तीन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांनी दिली.

राज्य राखीव दलाच्या चार तुकडय़ांसह १४०० हून अधिक पोलीस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांचे सुमारे ७०० चे संख्याबळ तोकडे पडत असल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणाहून पोलिसांची जादा कूमक मागविण्यात आली आहे. शहरातील सात भाग महापालिकेने करोनाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केले आहेत. त्यातील प्रतिबंधित क्षेत्र पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मालेगाव पूर्व आणि उर्वरित मालेगावशी बाहेरचा संपर्क तोडण्यात आला आहे. कोणतीही बाहेरील व्यक्ती शहरात येऊ  शकत नाही किंवा शहरातून बाहेर जाऊ  शकत नाही, असे सिंह यांनी सांगितले. जमावबंदीच्या अनुषंगाने सुमारे २०० गुन्हे दाखल झाले असून विनाकारण फिरणाऱ्या ३०० हून अधिक वाहनधारकांविरुध्द कारवाई करून ५८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. मालेगावचे प्रांत तथा उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी काढलेल्या आदेशानुसार १५ एप्रिल सकाळी सातपासून ३० एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत टाळेबंदी अधिक कडक राहणार आहे. तसेच १५ ते १९ एप्रिल या कालावधीत पाच दिवस बँकाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

या कालावधीत शहरात कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर फिरणे, वाहतूक, विनाकारण उभे राहणे, एकाच ठिकाणी रेंगाळून राहणे अशा सर्व प्रकारच्या कृत्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी नियंत्रित क्षेत्र म्हणून प्रतिबंधित केलेले भाग सोडून उर्वरित भागांतील औषध दुकाने, रुग्णालये, दूध आणि चारा पुरवठा करणारे विक्रेते, घरगुती गॅसचा पुरवठा करणारे वितरक या सेवांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. शहरातील पोलीस दक्षता पेट्रोल

पंप (रावळगांव नाका), मुत्तलिक पेट्रोल पंप (दरेगाव), उदयनराज ऑटोमोबाईल पेट्रोल पंप (मालेगाव कॅम्प) हे तीन पेट्रोल पंप सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच सुरु राहणार आहेत. हातगाडय़ांवर भाजी विक्री करणारे विक्रेत, किराणा दुकान यांना  सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.