‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमधील वास्तव

नाशिक : रणरणत्या उन्हात ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात लक्षात येते. परंतु, नाशिक शहरात असाही एक भाग आहे की, जो  प्रत्येक हंगामात पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: व्याकूळलेला असतो. परिसरातील एकमेव नळावरून सकाळी पिण्याचे पाणी भरून नेण्यासाठी महिलांसह लहानग्यांना कसरत करावी लागते. वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दरमहा पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागात किमान टँकरने तहान भागविली जाते. शहरात वास्तव्य करूनही शेकडो नागरिकांना १० वर्षांत महापालिका पिण्याचे पाणी, नागरी सुविधाही देऊ शकलेली नाही. आरटीओसमोरील पवार मळा परिसरातील पांडुरंग कॉलनीची ही व्यथा. रो हाऊस, इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्यांना नळ जोडणी मिळालेली नाही.

रजेच्या अर्जामुळे शनिवारी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम होईल की नाही, याविषयी संभ्रम आहे. गतवेळी हा उपक्रम ऐनवेळी स्थगित ठेवला गेला. त्या दिवशी पांडुरंग कॉलनीतील रहिवासी पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी कान्हेरे मैदानावर आले होते. लेखी तक्रार देऊन त्यांनी टोकनही घेतले होते. स्मार्ट सिटीअंतर्गत गावठाण भागात सलग २४ तास पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येत असताना याच गावठाणापासून चार ते पाच किलोमीटरवर असणाऱ्या भागात  एकवेळ पाणी मिळेल अशी कोणतीही व्यवस्था होत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. पांडुरंग कॉलनी हा ५२ भूखंडांचा परिसर. रो हाऊस, इमारतींमध्ये किमान ७०० ते ८०० नागरिक वास्तव्यास आहेत. परिसरातील मिळकतींना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देणाऱ्या पालिकेने पाण्याची गरज भागविण्याचे औदार्य दाखविले नाही. शहराचा झपाटय़ाने विकास होत असताना, घरोघरी नळ जोडणी मिळत असताना हा परिसर त्यापासून वंचित आहे. पेठ रस्त्यावरून कॅन्सर रुग्णालयाला लागून मखमलाबादकडे जाणाऱ्या १०० फुटी रस्त्याचे काम असेच रखडले आहे. परिसरात पाणी, इतर सुविधा आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही. फुटलेल्या चेंबरमधून पाणी वाहत असून आरोग्याच्या दृष्टीने ते धोकादायक आहे.

सद्य:स्थितीत शेकडो कुटुंबांसाठी परिसरात कॉलनीच्या प्रवेशद्वारालगत एकमेव सार्वजनिक नळ आहे. बंगले, इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाला पिण्याचे पाणी त्या नळावरून आणावे लागते. दैनंदिन वापराचे पाणी ज्यांच्याकडे कूपनलिका आहेत, त्यांच्याकडून खरेदी केले जाते. नगरसेवकांकडे, पालिकेत वारंवार अर्ज, विनंत्या करूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर स्थानिकांनी आपली व्यथा मांडली होती. पाणीपुरवठय़ाची व्यवस्था होण्यासाठी नियमानुसार लागणारी अनामत रक्कम, कर भरण्याची तयारी दर्शविली. खुद्द गेडाम यांनी या भागात भेट दिल्यावर स्थितीचे गांभिर्य लक्षात घेत जल वाहिनीचे काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. पुढे त्यांची बदली झाल्यामुळे स्थानिकांचा वनवास कायम राहिला. रहिवाशांना आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून आशा आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करणारे नेहमीच दिसतात. परंतु, प्रत्येक हंगामात पाण्यासाठी धावपळ करणारी मंडळी ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरात दिसते.

पांडुरंग कॉलनीतील शेकडो रहिवाश्यांना दूरवर असलेल्या परिसरातील एकमेव नळावरून पाणी भरावे लागते. गर्दीमुळे या नळावर दोन हंडे पाण्यासाठी तासभर थांबावे लागते. त्यामुळे मी अन्य भागातील नातेवाईकांच्या घरून दररोज गाडीवर एक कॅन भरून आणते. दैनंदिन वापराचे पाणी दरमहा २०० रुपये देऊन कूपनलिकाधारकाकडून घ्यावे लागते. ले-आऊट मंजूर झाले. रो हाऊस, इमारती उभ्या राहिल्या. परंतु, १० ते १५ वर्षांत महापालिकेला पाणीपुरवठा वितरण व्यवस्था उभारावी, असे वाटले नाही. परिणामी सर्व महिलांसह कुटुंबीयांची पाण्यासाठी परवड होत आहे.

      – रेखा पाठक, रहिवासी, पांडुरंग कॉलनी