गणेशगाव परिसराच्या व्यथेकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष

चारुशीला कुलकर्णी, नाशिक

‘बाई म्हणून जगणं काय असतं? सण असो वा वार..आम्ही दिवसातील चार ते पाच तास केवळ पाणीच वाहत असतो. नांगराला जुंपलेल्या बैलावानी.. त्याविषयी बोलता येत नाही म्हणून लेकरा-बाळांवर राग काढतो. पाण्याचा उपसा करून दमून घरात आलो की चिल्लीपिल्ली कावतात. भूक लागली खायला काय, असे विचारून भंडावून सोडतात. आता तुम्ही सांगा, पाणी आणायचं की जेवण करायचं..’

गंगुबाई महाले यांचा हा त्रागा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगांव ग्रुप ग्रामपंचायतीतील प्रत्येक मुलीचा, महिलांचा आहे.

प्रत्येक निवडणुकीत पाणीपुरवठय़ाचे आश्वासन मिळते. परंतु, या गावांला पिण्याचे पाणी मिळालेले नाही. सरकारने गांव ‘हंडामुक्तं’ करावे ही पाण्यासाठी दररोज वणवण भटकणाऱ्या महिलांची मागणी आहे. दुष्काळ गावच्या पाचवीला पुजलेला. यंदा त्याच्या झळा गेल्यावर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच बसू लागल्या. जिल्ह्य़ात शेकडो गाव-वाडय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतांना त्र्यंबकेश्वर तालुकाही त्यास अपवाद नाही. त्र्यंबकपासून अवघ्या १५ किलोमीटरावर असलेल्या गणेशगांव ग्रृप पंचायतीत गणेशगांव, विनायकनगर आणि गोरठाण गावांचा समावेश होता. तिन्ही गावांत पाण्याची समस्या बिकट झाली आहे. तिन्ही गावांची मिळून लोकसंख्या जवळपास १६०० असून त्यात महिलांची संख्या ८०० च्या जवळपास आहे.

पहाटे चार वाजता उठल्यावर गावातील एका विहिरीवरून दोन हंडे गरजेप्रमाणे खेपा करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसापुरता सोडविला जातो. घरात पिण्याचे पाणी आणल्यानंतर रोजची नेहमीची कामे उरकत स्वयंपाक झाल्यावर अकरानंतर या महिला धुणी, भांडय़ासाठी घराबाहेर पडतात. रणरणत्या उन्हात गाव विहिरीवर धुणी-भांडी करतात. मधल्या वेळेत अन्य कामे करून संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीमागे लागतात. घरात लागणारे पाणी भरून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा विहीर गाठावी लागते.

विनायकनगरच्या महिलांची वेगळी स्थिती नाही. गावातील विहीर कधीच आटली आहे. दोन-तीन टँकर पाणी विहिरीत टाकले तरी ते एक-दोन दिवसांच्या पलिकडे पुरत नाही. गावातील महिला धुणी-भांडी करायला दोन किलोमीटर अंतरावरील गणेशगावच्या विहिरीवर जातात. पिण्याच्या पाण्यासाठी तीच कसरत. दिवसातील निम्म्याहून अधिक वेळ खऱ्या अर्थाने पाण्यातच जातो,  असे राधाबाई महाले सांगतात. उजेड होण्याआधीच डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. गावात पाणी नसले की दीड किलोमीटरवर असलेल्या गणेशगावच्या विहिरीवर नाहीतर, वन विभागाच्या हद्दीत. जिथे सापडेल त्या ठिकाणाहून पिण्याचे पाणी डोक्यावर घेऊन यावे लागते, असे त्यांनी सांगितले. तर वेणुबाई खोटरे यांनी घरात एकापेक्षा अधिक बायका असतील तर एक जण पाण्यासाठी फिरते आणि दुसरी तोवर घरातील कामे करून घेते, असे नमूद केले. एकटी बाई असेल तर मग पाणी, घरातील काम यातच तिचा वेळ निघून जातो. पुरुष मंडळी पाणी ने-आण करण्यासाठी मदत करीत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

गोरठाणला तर विहीरही नाही. हातपंप हाच काय तो आधार. या ठिकाणी पहाटे चारपासून ते रात्री १२ पर्यंत महिला क्रमाक्रमाने पाणी भरत असतात. क्रमांक बदलला, पाणी मिळाले नाही यावरून महिलांमधील भांडणे नेहमीची आहेत, असे नानु सकोरे यांनी सांगितले. अगदी पाच वर्षांच्या मुलीपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सारे रणरणत्या उन्हात पाणी भरण्याच्या कामात मग्न असतात. हातपंपातून पाणी संथपणे येते. ते उपसण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. घरातील कामे सांभाळून पाणी आणावे लागते. पाण्यासाठी वेळ जात असल्याने घरच्यांनी १०वीनंतर शिक्षण थांबवून घरी बसवत केवळ पाणी संपलं की पंपावरून पाणी आणायचे काम करण्याची जबाबदारी टाकली. पाण्यामुळे शिक्षण थांबल्याची व्यथा कविता सत्वर मांडते.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एका कोपऱ्यात वसलेल्या या गावच्या समस्यांकडे पाहण्यास कोणाला वेळ नाही. प्रचारासाठी कोणी अद्याप फिरकलेले नाही. स्थानिक आमदार एकदाच सात वर्षांपूर्वी आल्या होत्या. तेव्हां त्यांनी हंडामुक्त गाव करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यानंतर त्या कधीही गावात आल्या नाहीत. नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या गावात खासदार कधी आलेले नाहीत. प्रचारासाठी कोणी आले तर पाण्याचा प्रश्न मांडण्याची आस महिला बाळगून आहेत.