अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये अर्ज करावा लागतो. अर्ज ते प्रवेश प्रक्रिया या प्रवासात होणारी विद्यार्थी व पालकांची दमछाक पाहता त्यावर पर्याय म्हणून शहरात केंद्रीयकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी, अशी मागणी येथील एसएफआय संघटनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात शिक्षण उपसंचालक एन. बी. औताडे यांना संघटनेने निवेदन दिले. यावर औताडे यांनी प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविली.
संघटनेने अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाकडे लक्ष वेधले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना दोनहून अधिक महाविद्यालयांमध्ये अर्ज करावा लागतो. एका महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासाठी किमान १०० रुपये खर्च येतो. त्यात नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच आर्थिक भरुदड टाळण्यासाठी ‘ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया’ हा सर्वात चांगला पर्याय आहे. यातून प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून होणारे दलालीचे प्रकार, गैरमार्गाने होणारे प्रवेश, पालकांकडून डोनेशन स्वरूपात जास्तीचा पैसा आकारणे, महाविद्यालय प्रशासनाकडून विहित प्रवेशाच्या जागा न दाखवता अडवणूक करत व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश आदी गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, याकडे संघटनेने निवेदनात लक्ष वेधले. शिक्षण विभागाने नाशिक शहर तसेच परिक्षेत्रात अकरावी प्रवेश केंद्रीयकृत करून लवकरात लवकर यासाठी एक खिडकी, एक केंद्रीय पद्धतीने राबवावी, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ चा दहावी निकाल जाहीर होण्याआधीच ऑनलाइन प्रवेशासाठी संकेतस्थळाची सुरुवात करावी, दुष्काळी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश खर्च शासनाने करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शहर परिसरात राबविण्याबाबत औताडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. अकरावी केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणा राबवावी लागते. नाशकात ऑनलाइन प्रवेश व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र संपूर्ण प्रक्रिया सुरू होण्यास अवधी जाऊ द्यावा लागेल, असे औताडे यांनी सांगितले. याची माहिती संघटनेने दिली.