स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य समितीचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर येथील खुटवड नगरमधील सिटू भवनात ९ ते १२ जून या कालावधीत होणार आहे. चार दिवसांच्या शिबिरास राज्यातून २०० प्रतिनिधि उपस्थित राहणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन सिटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते होणार असून, ‘आजचा विद्यार्थी, उद्याचा श्रमिक’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. ‘सर्वाना शिक्षण सर्वाना काम’ या मूलभूत मागणीसह विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी फेडरेशन ४६ वर्षांंपासून काम करत आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांसमोर शुल्क वाढ, खासगीकरण यासह पेपरफूट, निकाल उशिरा लागणे, शिष्यवृत्ती न मिळणे, समाज कल्याण, आदिवासी वसतिगृहातील सुविधा यांसारखे प्रश्न आहेत. नाशिक शहरात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून संघटना आंदोलन करत आहे. अभ्यासाबरोबरच शिक्षणाशी निगडीत इतरही विषयांची जाण आणि त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी तसेच होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची जाणीव निर्माण व्हावी हा या शिबिराचा उद्देश आहे. शैक्षणिक विषयाबरोबरच शिबिरात ‘दुष्काळ मानवनिर्मित की निसर्ग निर्मित’ या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक कुमार शिराळकर, ‘धर्म जात वर्ग’ विषयावर डॉ. अजित नवले, ‘शिक्षणाचे बाजारीकरण’ विषयावर शिक्षण बाजारीकरण मंचचे मििलद वाघ मार्गदर्शन करणार आहेत.
‘स्त्री-पुरुष विषमतेचे स्वरूप आणि उपाय’’ हा विषय मंजुश्री कबाडे तर संघटनेची घटना व कार्यक्रम संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण तसेच संघटना बांधणी या विषयावर राज्याध्यक्ष मोहन जाधव हे मार्गदर्शन करतील. संघटनेचे अखिल भारतीय सचिव दिल्ली येथील विक्रम सिंग हे ११ जून रोजी ‘शैक्षणिक संस्थांवरील हल्ले आणि राष्ट्रवाद’ या विषयावर मत मांडतील.
कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मोहन जाधव व सचिव दत्ता चव्हाण यांनी केले आहे.