शरद पवार यांची कुलगुरूंचे भाषण मध्येच थांबवित सूचना; यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कार्यक्रम

गांधी हत्या करणाऱ्या विचारांच्या लोकांनी गांधी ‘वध’ हा शब्द बेमालुमपणे समाजात रुजविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्याचा प्रयोग इतक्या सहजपणे केला जातो की, बोलताना त्याचे भानही राहत नाही. ‘वध’ या शब्दाचा वापर कशासाठी केला जातो, त्याचा दाखला देत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी गांधीजी यांचा खून करण्यात आल्याचा उल्लेख करणे उचित असल्याचा सल्ला मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिला. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमात कुलगुरूंनी आपल्या भाषणात गांधी वधाचा खटला असा उल्लेख केल्यावर पवार यांनी त्यांना लगेच थांबवित गांधीजी यांच्या खूनाचा खटला असा उल्लेख करण्यास सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला दालनाचे उद्घाटन आणि ‘यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन शनिवारी पवार यांच्या हस्ते झाले.

भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याकडून ‘गांधी वधाचा खटला’ असा उल्लेख झाल्यावर पवार यांनी त्यांना थांबवत चूक दुरूस्त करण्यास सांगितले. नंतर आपल्या भाषणात त्यांनी हा शब्द रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कार्यशैली कथन केली.

पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. पंचायत राज, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी खेडय़ापाडय़ातील सामान्य माणसाचा विकासाला गती देण्याचे काम केले.

संघर्षांसाठी तयार रहावे

सध्या कांद्यासह कृषी मालाच्या भाव गडगडले आहेत. तरूण शेतकऱ्यांनी या मुद्यावर संघर्षांसाठी तयार रहावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. मविप्र शिक्षण संस्थेच्या सायखेडा महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन व नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वी कृषिमंत्रीपदी असताना भाव गडगडल्यामुळे देवळा तालुक्यात आपले स्वागत कांद्यांनी करण्यात आले होते याची आठवणही करून दिली.