नाशिक : सरपंच ते मंत्रिपद या राजकीय प्रवासात शेतीशी नाळ घट्ट ठेवत सहकार, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणारे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व, माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे गेल्या शुक्रवारी रात्री आजाराने निधन झाले. पुलोदच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या विनायकदादांशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बुधवारी पवार हे नाशिकमध्ये येत आहेत.

विनायक दादांनी राज्याच्या मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि युवक सेवा या विभागांची जबाबदारी सांभाळली होती. पुलोदच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतरही दादा काँग्रेसमध्येच राहिले. परंतु, उभयतांमधील संबंध जिव्हाळ्याचे राहिले. कृषी, सहकार, राजकारणात कायम सोबत राहिलेल्या विनायक दादांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित राहू न शकल्याने कु टुंबीयांच्या सांत्वनासाठी बुधवारी शरद पवार हे नाशिकमध्ये येणार असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत टकले यांनी सांगितले. सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील विनायक दादांच्या घरी  पवार जाणार आहेत. पवार यांच्या दौऱ्यात अन्य कुठलाही कार्यक्रम नसल्याचे टकले यांनी नमूद के ले.