नाशिक : राज्य संकटात असताना सत्ता स्थापनेवरून पोरखेळ सुरू आहे. या स्थितीतून मार्ग काढावा लागेल. आता तर सरकारच नाही. कधी येईल ते माहीत नाही. सरकार आले तर ठीक, अन्यथा केंद्राकडे शेतकऱ्यांसाठी जावे लागेल. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीप्रमाणे पंचनामे करून सरकारने जास्तीतजास्त मदत द्यावी. भरपाई देताना कर्जमाफीसारखी आडमुठी भूमिका घेतल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी दिला.

राज्यात सत्ता स्थापनेत मग्न असणाऱ्या राजकीय पक्षांविषयी शेतकरीवर्गातून रोष व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर, एकाच दिवशी शरद पवार यांच्यासह फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगवेगळ्या भागांत भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पवार यांच्यासमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. नाशिकप्रमाणे मराठवाडय़ातही मोठे नुकसान झाले आहे. अत्यल्प भरपाईचा नियम दूर करावा लागेल. बिकट स्थितीतील शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी शासनाला भाग पाडले जाईल, असे पवार यांनी सांगितले.

हंगामपूर्व द्राक्ष पिकविणारा बागलाण हा एकमेव टापू देशाला कोटय़वधीचे परकीय चलन मिळवून देतो. या पिकाला आणि पिकविणाऱ्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या पिकाला विमा कवच देण्यासाठी केंद्र सरकारकडे लगेचच प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.