नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांच्या एकूण संख्येने १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी येथे भेट दिली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकला येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु, त्यांच्या दौऱ्याआधी म्हणजे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे नाशिकला भेट देऊन करोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. या  गोंधळावर भाजपने पुन्हा प्रत्येक पक्ष वेगवेगळे काम करीत असल्याचा आक्षेप घेतला आहे.

राज्यात करोनाचे केंद्रबिंदू ठरलेले भाग राजकीय आखाडे ठरत आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या आढावा दौऱ्यात  सरकारवर टिकास्त्र सोडले गेले. मुंबई, ठाणे महापालिका आणि नाशिक महापालिका येथील राजकीय स्थितीत फरक आहे. दोन्ही महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून नाशिक महापालिका मात्र भाजपकडे आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यात नाशिक महापालिकेला राज्य सरकारने अपेक्षित मदत केली नसल्याचा आक्षेप नोंदविला गेला. त्यांच्या दौऱ्यास २४ तास उलटण्याच्या आत महाविकास आघाडीला देखील त्याची गरज भासली. शहरात  दैनंदिन ३०० ते ४०० करोना रुग्णांची भर पडत असतांना फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला होता.

पालकमंत्री छगन भुजबळ  हे जिल्ह्य़ातील स्थितीवर तर कृषिमंत्री दादा भुसे हे नाशिक महापालिकेतील उपाय योजनांवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या आठवडय़ात आढावा बैठकीनंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच नाशिक दौरा करणार असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्य़ात वा शहरात टाळेबंदी लागू करायची की नाही हे ठरविले जाईल, असेही सांगितले होते.परंतु,  त्यांचा दौरा काही कारणास्तव पुढे ढकलला गेला. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री नाशिकमध्ये करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे काम करत असून त्यांच्यात समन्वय नाही. दौऱ्याच्या कार्यक्रमावरून ते पुन्हा अधोरेखीत झाले. कृषिमंत्री महापालिकेत येऊन आढावा घेतात. तेव्हा महापौरांना निमंत्रण दिले जात नाही. मध्यंतरी आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली होती. तेव्हा स्थानिक आमदारांना प्रवेश दिला गेला नाही. करोना काळात राजकारण बाजुला ठेऊन सर्वानी एकत्रितपणे काम करायला हवे. मात्र, राज्य शासनाकडून तसे घडत नाही. करोनाबाधितांची संख्या वाढत असताना महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा भेडसावत आहे. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी कोणाची आहे ?

– आ. प्रा. देवयानी फरांदे  (भाजप)