शरद पवार यांचा आरोप

नाशिक : सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याने आता जनतेला कुठल्या मुद्दय़ावर आकर्षित करायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. यासाठी आता सैनिकांनी केलेल्या त्यागाचे, शौर्याचे भांडवल करीत सरकार राजकारण करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

येथील चोपडा लॉन्समध्ये राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. कार्यक्रमास पवार यांच्यासह आमदार छगन भुजबळ, पंकज भुजबळ, हेमंत टकले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, रवींद्र पगार तसेच समीर भुजबळ, अर्जुन टिळे आदी उपस्थित होते.

या वेळी पवार यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले. सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पाळली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तान आम्हाला घाबरल्यामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्याचा दावा पंतप्रधान करतात. सरकार जर शूर आहे, तर मग कुलभूषण जाधव पाकिस्तान तुरुंगात दोन वर्षांपासून का आहे? असा प्रश्न उपस्थित केला. सीमेवर लढतं कोण? त्याचे श्रेय घेतं कोण? शहिदांच्या त्यागाचे राजकारण करू नका, अशी विनंती शहिदांच्या कुटुंबीयांना करावी लागणे ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक आघाडी सरकारच्या काळात जागतिक पातळीवर विकसित शहरांच्या यादीत १६ व्या स्थानावर होते. नुकत्याच ऑक्सफोर्ड संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नाशिक पहिल्या १०० मध्येही नाही. नागपूरचे नाव या यादीत असून स्मार्ट सिटीतही नाशिक पुणे, नागपूर, अमरावतीनंतर आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या शहराची ही अवस्था का झाली? गुजरातला पाणी देण्यासाठी केंद्राने दबाव आणल्यामुळे राज्य सरकारने गुजरात सरकारबरोबर करार केला आहे. केंद्र  सरकार पैसा देत असला तरी पाणी आपले आहे. राज्यातूनही केंद्र सरकारकडे मोठय़ा प्रमाणावर महसूल जमा होत असताना गुजरातला पाणी देण्याचा अट्टहास का? दत्तक पिता म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाशिकला काय दिले, असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.

माजी आमदार अपूर्व हिरे यांनी दत्तक घ्यायचे आणि कुपोषित ठेवावे अशी योजना सध्या सुरू असल्याची टीका केली. नगरसेविका समीना मेमन, गजानन शेलार यांचीही भाषणे झाली. दरम्यान, मेळाव्यात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवार यांना सांगत शेतमालासह सरकारकडे प्रलंबित असलेले अनुदान आदी विषयांकडे लक्ष वेधले. इगतपुरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

संपूर्ण कार्यक्रम ‘भुजबळ’मय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘कार्यकर्ता मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्यात आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्याला कोणत्या मुद्दय़ावर काम करावे लागेल, आपली बलस्थाने, आपण कुठे कमी पडतो याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे होते. मात्र संपूर्ण मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांनी कोणती विकास कामे केली, याची यादी वाचण्यात प्रत्येक जण मश्गूल राहिला. संपूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप भुजबळमय झाल्याने व्यासपीठासह अनेक कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीकडे नजर वळवली. दुपारची वेळ असल्याने काहींनी डुलकीही घेतली.

समीरमुळेच आज जिवंत

केंद्र तसेच राज्य सरकारविरुद्ध बोलत होतो म्हणून माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावत खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. तुरुंगात मला आरोग्यविषयक त्रास सुरू झाला. तेथील वैद्यकीय व्यवस्थेने फरक पडत नव्हता. समीर माझ्यासाठी काळजी करायचा. त्याने शरद पवार यांना ही माहिती दिली. त्या वेळी पवार यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून भुजबळ यांना काही झाले तर जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू झाले. समीर नसता तर मी जिवंत नसतो, आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.