अनिकेत साठे

करोना या आजारावर संशोधनासाठी येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे ११४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातील दोन संशोधन प्रस्तावांना ५० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित प्रस्तावांची छाननी सुरू आहे. करोनाकाळात आरोग्य विद्यापीठाचे काम कुठेही दिसत नसल्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा बैठकीत लक्ष वेधले होते. निमंत्रण नसल्याने बैठकीत विद्यापीठाचे कोणीही नव्हते. विद्यापीठाने या काळात केलेल्या कामांची सविस्तर माहिती पवार यांच्यासह आरोग्यमंत्र्यांना लेखी स्वरुपात सादर करण्यात आली आहे.

राज्यात वैद्यकीय शिक्षण देणारे मुख्य केंद्र म्हणजे आरोग्य विद्यापीठ. पण करोना संकटात त्यांचे काम कुठेही दिसत नसल्याचा उल्लेख पवार यांनी केला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय यांचे अधिकारी-कर्मचारी शिक्षण क्षेत्रात असले तरी ते डॉक्टरच आहेत. करोनाकाळात त्यांचा तातडीने सहभाग घेण्याचे निर्देश दिले. या निमित्ताने आरोग्य विद्यापीठाशी संबंधित प्रलंबित प्रश्न समोर आले. आरोग्य विद्यापीठ जिथे स्थानापन्न आहे, तिथे केवळ चार डॉक्टर कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव रखडला असल्याने वैद्यकीय मनुष्यबळही उपलब्ध नाही. बैठकीत कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर विद्यापीठाने आपल्या कार्याची माहिती पत्राद्वारे मांडली.

नाशिकमध्ये करोनाच्या निदानासाठी प्रयोगशाळा नव्हती. मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी विद्यापीठाने दोन ‘आरटी-पीसीआर’ उपकरणे हस्तांतरीत केली. या उपकरणांसह प्रयोगशाळेचा उपयोग स्थानिक पातळीवर करोना रुग्णांसाठी होत आहे. विद्यापीठाने ‘ओमनीक्युरस’ यंत्रणेचा उपयोग करून करोना योद्धय़ांमध्ये जागृती करण्यासाठी करोना व्यवस्थापन हा विशेष अभ्यासक्रम राबविला. त्यामध्ये ४०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची अद्ययावत शास्त्रोक्त माहिती मिळवण्यासाठी सुरू केलेले अभ्यासक्रम, प्रशिक्षणाची माहिती विद्यापीठाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केली. करोनाच्या जनजागृतीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रशिक्षणात आतापर्यंत ३३ हजार ५०० अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. याच काळात विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इ शिक्षणांतर्गत १०७५ व्याख्यानांचे थेट प्रक्षेपण केले. ही व्याख्याने समाज माध्यमावरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली. टाळेबंदीत विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर करावा लागला. करोनाकाळात रुग्णसेवेसाठी जास्तीत जास्त डॉक्टर उपलब्ध  होण्यासाठी हिवाळी २०१८ परीक्षेला बसलेल्या ३८०० विद्यार्थ्यांना आंतरवासीयता पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात आले.

पुण्यातील विद्यार्थी वैद्यकीय सेवेत

पुण्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे जिल्ह्य़ातील विद्यापीठ संलग्नित सर्व आयुर्वेद, परिचारिका महाविद्यालयातील अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेले आणि अंतिम वर्षांत शिकत असणारे विद्यार्थी पुणे येथील करोना रुग्णालये आणि काळजी केंद्रात उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. परिचारिका, निमवैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांचीही उपलब्धता सर्वत्र करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ८८०० स्वयंसेवक जनजागृतीचे अव्याहतपणे काम करत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता यांच्याशी कुलगुरू दृकश्राव्य माध्यमातून बैठकी, परिसंवाद आयोजित करत आहेत. करोनाच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जात असल्याचे विद्यापीठाने शरद पवार, आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.