शाळांसाठी दोन अंक बंधनकारकमुळे नाराजी

चारूशीला कुलकर्णी

नाशिक : शिक्षण क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींचा धावता आढावा घेणाऱ्या ‘शिक्षण संक्रमण’ मासिकाला टपाल कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. परिणामी शिक्षक, विद्यार्थ्यांना माहितीच्या खजिन्यापासून वंचित राहावे लागत आहे. दुसरीकडे, अंक वेळेत मिळत नसतानाही शिक्षण विभागाने अंकाची किंमत वाढवून प्रत्येक शाळेला दोन अंक घेणे बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आठवी ते १२ वी या वर्गात शिक्षणाविषयी सुरू असणारे प्रयोग, एखाद्या विषयाची सखोल माहिती, संकल्पना याविषयी ज्येष्ठ शिक्षक, अनुभवी शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन, शिक्षणविषयक शिष्यवृत्ती, योजना आदींची माहिती दिली जात आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी वर्गाची नोंद करताना शिक्षण संक्रमण मासिकासाठी नोंदणी केली जाते. यासाठी सद्य:स्थितीत २५० रुपये शुल्क आकारण्यात येते. शिक्षण संक्रमण अंक मंडळाच्या वतीने दरमहा प्रसिद्ध केला जातो. तथापि वर्षांतून एकवेळा मे-जून महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने जोडअंक प्रसिद्ध केला जातो. वर्षांतून ११ अंक प्रसिद्ध केले जातात.

सद्य:स्थितीत टपाल विभागाकडून ३२,९०० प्रती टपालाव्दारे वितरित करण्यात येतात. नऊ विभागीय मंडळे आणि राज्य मंडळासाठी असे एकूण ३४ हजार अंकांची छपाई करत वितरित करण्यात येतात.

दीड वर्षांपासून अंक वितरणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अंक शाळेत वेळेत येत नाही. टपाल विभागातच अंकाचे गठ्ठे पडून राहतात. परिणामी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना या माहितीच्या खजिन्यापासून वंचित राहावे लागते.

यंदा अंकाची किंमत २५० रुपये करण्यात आली असून शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेसाठी दोन अंक बंधनकारक करण्यात आले आहेत. वास्तविक शिक्षण विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने मोफत अंक प्रसिद्ध होत असताना आणि अंक वितरणाच्या तक्रारी असताना दोन अंक बंधनकारक का, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात उपस्थित होत आहे.

अंक न मिळालेल्यांनी पुणे विभागाशी संपर्क साधावा

१० वी वर्गाची नोंदणी करताना ‘शिक्षण संक्रमण’ अंकाचीही नोंदणी करण्यात येते. हे अत्यल्प किमतीचे मासिक असून यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयोगाची माहिती दिली जाते. याबाबत टपाल विभागाच्या अडचणी आहेत. ज्या शाळांना अंक मिळाला नसेल त्यांनी थेट शिक्षणअधिकारी, शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. दोन अंक बंधनकारक नाही; पण एक शाळेसाठी तसेच एक अंक शिक्षकांसाठी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

– नितीन उपासनी (सचिव, नाशिक विभाग शिक्षण मंडळ)