बहुप्रतीक्षित शिर्डी (काकडी) विमानतळावर आज पहिले विमान उतरले, त्यातून विमानतळ विकास प्राधिकरणाने विमानतळाची चाचणी घेतली. मे महिन्यात हा विमानतळ सुरू होणार असून काकडी गावातील स्थानिक प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील अशी माहिती विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक विश्वास पाटील यांनी दिली. पहिल्यांदाच धावपट्टीवर विमान उतरल्याने ते बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अनेक दिवसापासून शिर्डी विमानतळ कधी सुरू होणार याची चर्चा सुरू आहे. विमानतळाचे काम अंतिम टप्यात आहे. आज विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची चाचणी घेतली मुंबईहून निघालेले सहा आसनी विमान आज शिर्डीच्या विमानतळावर पहिल्यांदा यशस्वीपणे उतरले यावेळी नागरीकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली होती. अधिकारी विमानाने येणार आहेत ही माहिती न दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्यांदाच आज विमान धावपट्टीवर उतरल्याने विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अकराशे एकर जमीन या विमानतळासाठी संपादित करण्यात आली असून ३५० कोटी रूपये खर्च असणाऱ्या या विमानतळासाठी दोनशे कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे. उर्वरित कामासाठी राज्य सरकारने १०० कोटी रूपये देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. धावपट्टी तयार झाली असून विमानतळाचे राहिलेले काम लवकर पूर्ण होवून येत्या मे महिन्यात प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती विश्वास पाटील यांनी दिली.
काकडी गावातील रस्त्यांच्या मंजुरीसंदर्भातील अडचणी दूर झाल्या असून, आठ दिवसामध्ये हे काम सुरू करण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी दहा कोटी रूपये मंजूर केले असून हे कामही पंधरा दिवसांत सुरू होईल. विकासाचे कोणतेच प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही असे पाटील म्हणाले.