शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भाविकांनी भरभरुन दान केले असून २०१६- १७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये साई संस्थानला तब्बल १०० कोटी रुपयांचे अधिकचे दान प्राप्त झाले आहे. यासह साई संस्थानच्या गंगाजळीचा आकडा आता २ हजार कोटींच्यावर जाऊन पोहोचला आहे.

देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपतीची गणना केली जाते. त्यानंतर शिर्डीतील साईबाबा संस्थानचा नंबर लागतो. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असतानाच साईचरणी होणारे दानही वाढले आहे.
गेल्या वर्षी नोटाबंदीनंतरही दानपेटीतील आकड्यात घट झाली नव्हती. गेल्या आर्थिक वर्षांत साई संस्थानला साईभक्तांनी तब्बल ३०० कोटी रुपयांचे दान दिले होते. त्याच्या मागच्या वर्षीचा आकडा हा २१० कोटी होता. गेल्या आर्थिक वर्षांत भक्तांनी साईंच्या तिजोरीत १०० कोटीहून अधिकची भर टाकल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली.

सन २०१७- १८ हे वर्ष साईबाबांचे समाधी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षांच्या सुरुवातीलाच साईभक्तांनी दानासाठी रिघ लावल्याचे दिसून आले आहे. यावर्षी साईबाबा संस्थानचा आर्थिक लेखाजोखा हा तब्बल ५८० कोटी रुपयांचा झाला असून त्यातील २८० कोटींच्या वर साई संस्थानचा खर्च झाला आहे. साई संस्थानने विविध बँका आणि रोख्यांमध्ये आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर साई संस्थानकडे ४७० किलो सोने आणि ६ हजार ५०० किलो चांदी जमा आहे. याशिवाय संस्थानकडे स्थावर आणि जंगम मालमत्ताही मोठी आहे.