नाशिकमधील १७ जणांना शिवछत्रपती पुरस्कार

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, ऑलिम्पियन नौकनयनपटू दत्तू भोकनळ, बुद्धिबळातील नवा राजा विदित गुजराथी आदींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचलेल्या नाशिकच्या क्रीडा क्षेत्रास सोमवारी राज्याचे प्रतिष्ठेचे शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यावर आनंदाचे उधाण आले. तीन वर्षांच्या पुरस्कार यादीत १७ नाशिककरांचा समावेश आहे. त्यात थेट पुरस्काराचे मानकरी विदित गुजराथी, दत्तू भोकनळ, विजेंद्र सिंग, प्रज्ञा गद्रे, सचिन गलांडे हे आहेत.

राज्य शासनाचे बहुप्रतीक्षित शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. तीन वर्षांपासून हे पुरस्कार विविध कारणांमुळे रखडले होते. पुरस्कार यादीतील नाशिकचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवत आहे. कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव यांसह अनेक आंतरराष्ट्रीय धावपटू घडविणारे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना शिवछत्रपती पुरस्कार वारंवार हुलकावणी देत होता. अखेर त्यांना थेट पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय बुद्धिबळात आपल्या कामगिरीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणारा विदित गुजराथी, बॅडमिंटनपटू प्रज्ञा गद्रे, शरीरसौष्ठवपटू सचिन गलांडे हेही थेट पुरस्काराचे मानकरी ठरले.

याशिवाय २०१४-१५ वर्षांसाठी तलवारबाज अस्मिता दुधारे, निशाणेबाज श्रेया गावंडे, २०१५-१६ वर्षांसाठी निशाणेबाज अक्षय अष्टपुत्रे, श्रद्धा नालमवार, २०१६-१७ वर्षांसाठी धावपटू संजीवनी जाधव, तलवारबाज शरयू पाटील, नौकानयनपटू संतोष कडाळे आणि विशेष साहसी प्रकारासाठी रॅम सायकल शर्यत पूर्ण करणारे महेंद्र आणि हितेंद्र या महाजन या खेळाडू्ंना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नाशिकचे क्रीडा संघटक, प्रशिक्षकांचाही पुरस्कार मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. त्यात २०१४-१५ वर्षांसाठी तलवारबाजीसाठी राजू शिंदे, २०१५-१६ वर्षांसाठी क्रीडा संघटक म्हणून अविनाश खैरनार, २०१६-१७ वर्षांसाठी नौकानयन प्रशिक्षक अंबादास तांबे यांचा समावेश आहे.

खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, संघटकांना काम करण्यासाठी अधिक उत्साहवर्धक असे हे पुरस्कार लाभले असल्याने क्रीडा क्षेत्राकडे अधिक प्रमाणावर विद्यार्थी वळण्याची शक्यता आहे. नाशिकचे यश तलवारबाजी असो, नौकानयन असो, धावणे असो किंवा नेमबाजी असो, सर्वच क्षेत्रात मिळाले आहे. त्यामुळेच नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला अधिक आनंद झाला असल्याचे विविध खेळांच्या प्रशिक्षकांचे मत आहे.

मोठय़ा प्रमाणात पुरस्काराची पहिलीच वेळ

एकाच वेळी इतक्या मोठय़ा प्रमाणावर शिवछत्रपती पुरस्कार वाटय़ाला येण्याची नाशिकसाठी ही पहिलीच वेळ आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांमध्ये आतापर्यंत नाशिकच्या तलवारबाजपटूंचे वर्चस्व राहत आले आहे. या यादीतही तलवारबाजीशी संबंधित तीन पुरस्कार मिळाले असले तरी बरोबरीची कामगिरी नेमबाज आणि नौकानयनपटूंनीही केली आहे. या पुरस्कारांमुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रास नवी झळाळी मिळाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.