25 November 2017

News Flash

बळीराजाच्या व्यथेवर वातानुकूलित मंथन

उद्धव यांचा मुक्काम विश्रामगृहात

अनिकेत साठे, नाशिक | Updated: May 19, 2017 1:12 AM

नाशिक दौऱ्यात उद्धव यांचा मुक्काम कायम पंचतारांकित हॉटेलात राहिला. मात्र, अधिवेशनावेळी शिवसेनेने साधेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव अन् त्यामुळे वाढणाऱ्या आत्महत्या, तुरीमुळे उठलेले वादळ, समृद्धी महामार्गामुळे शेत जमिनींवर आलेले संकट.. शेतकरी व शेतीशी संबंधित अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शिवसेनेतर्फे येथे आयोजित कृषी अधिवेशनात थंडगार वातावरणात मंथन होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेले शेतकरी प्रतिनिधी उन्हातान्हात राबणाऱ्या बळीराजाच्या व्यथा मांडतील. खा. राजू शेट्टी, वनाधिपती विनायकदादा पाटील यांसारखे दिग्गज उपायांबाबत मार्गदर्शन करतील. अधिवेशनाचा समारोप सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे. वातानुकूलीत सभागृहात जागा कमी पडेल हे लक्षात घेऊन शिवसेनेने मुख्य सभागृहाबाहेर खास शामियाना, एलईडी स्क्रिनची व्यवस्था करत लाल गालिचाही अंथरला आहे.

महापालिका निवडणुकांनंतर शिवसेनेतर्फे महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे केवळ शेतकऱ्यांच्या समस्यांवर अधिवेशनाचे आयोजन होत आहे. या अधिवेशनाला सेनेचे मंत्री, सर्व जिल्हाप्रमुख, उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी अधिवेशनात सहभागी होत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव हेही अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्स येथे आज, शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत हे अधिवेशन होत आहे. अतिशय श्रीमंत लग्न सोहळ्यांसाठी वापरले जाणारे हे ठिकाण आहे. त्याचे दिवसाचे भाडे तब्बल दीड लाख रुपये आहे. तीन दिवस आधीपासून या ठिकाणी चाललेली जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. भव्य आकाराच्या सभागृहात ४० हून अधिक वातानुकूलीत यंत्रणा आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित ठेवायची असल्यास प्रतितास १५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अधिवेशनाच्या दिवशी सकाळपासून ही यंत्रणा सलग आठ-नऊ तास कार्यरत राखून आल्हाददायक वातावरण ठेवण्याचे नियोजन आहे.

सेनेच्या अधिवेशनासाठी साडे तीन हजार आसन क्षमतेचे पालिकेचे अन्य भव्य सभागृह योग्य असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तथापि, त्या ठिकाणी वातानुकूलीत यंत्रणा नाही. चोपडा लॉन्सच्या वातानुकूलीत सभागृहात दोन हजार खुच्र्याची व्यवस्था करण्यात आली. शेतकरी प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची अधिक गर्दी होईल हे गृहीत धरून बाहेरील बाजूला शामियाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी उन्हाच्या झळा बसू नये म्हणून पांढऱ्या रंगाचे कापड आच्छादनास वापरण्यात आले. मुख्य सभागृहात एक आणि बाहेरील शामियान्यात दोन असे एकूण तीन ‘एलईडी स्क्रीन’ उभारून अधिवेशनातील चर्चा सर्वाना पहावयास मिळेल, अशी तजवीज करण्यात आली आहे.

उद्धव यांचा मुक्काम विश्रामगृहात

नाशिक दौऱ्यात उद्धव यांचा मुक्काम कायम पंचतारांकित हॉटेलात राहिला. मात्र, अधिवेशनावेळी शिवसेनेने साधेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे. खुद्द ठाकरे यांच्यासह पक्षाचे मंत्री, आमदार कोणीही हॉटेलमध्ये वास्तव्य करणार नाही. सर्व मंडळी शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत. अधिवेशनात येणाऱ्यांसाठी शहरातील कोणत्याही हॉटेलमध्ये नोंदणी केली नसल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

First Published on May 19, 2017 1:11 am

Web Title: shiv sena agriculture convention in nashik uddhav thackeray