नियमबाह्य़ कामांवरून गोंधळ; राजदंड पळविण्याचा प्रयत्न; निधी वाटपात भेदभावाचा आक्षेप

महिला बाल कल्याण समितीच्या निधी वाटपात नियमबाह्य़ कामे घुसवून भाजप सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करत शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. महिला बाल कल्याण समितीच्यामार्फत एका प्रभागात २० ‘ग्रीन जीम’, अंगणवाडी, सभागृह बांधणी अशी नियमबाह्य़ कामे समाविष्ट करण्यात आली. इतर सदस्यांची कामे नाकारत भाजप मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार करत विरोधकांनी महापौरांसमोरील राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या गोंधळात सर्व विषयांना मान्यता देत महापौरांनी सभेचे कामकाज गुंडाळले. नियमबाह्य़ कामांविषयी विरोधकांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यांनी नियमात न बसणारी कामे केली जाणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत पार पडली. गतवेळी आयुक्तांनी आधीच्या सभेचे इतिवृत्त पुढील सभेत लगेच ठेवण्यास बजावले होते. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मान्यतेसाठी ठेवले गेले.

त्यात मालमत्ता करवाढीचा विषय असल्याने पुन्हा चर्चा होईल, अशी शक्यता होती. परंतु, इतिवृत्ताचे वाचन झाल्यावर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी त्यास आक्षेप घेतला. मालमत्ता करवाढीला विरोधकांनी विरोध दर्शवित बहिष्कार टाकला असतांना इतिवृत्तात मात्र सर्वानुमते मंजूर असा उल्लेख कसा करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी केला. याचवेळी महिला बाल कल्याण समितीच्या निधीवरून नयना गांगुर्डे यांनी भाजपला धारेवर धरले. सदस्यांनी काही कामे सुचविली तर सत्ताधारी शासकीय परिपत्रक पुढे करतात.

भाजप गटनेत्याच्या प्रभागात २० ग्रीन जीम आणि अन्य प्रभागात अंगणवाडीची उभारणी, अशी कामे समाविष्ट केली गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महापौरांनी दुरुस्तीसह मंजुरी देण्याची तयारी दर्शविली असता विरोधी सदस्यांनी ही कामे रद्द करण्याची मागणी लावून धरली. सेनेच्या नगरसेविका, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आदी महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करू लागले. हे पाहून भाजपचे सदस्यही पुढे सरसावले.

दरम्यानच्या काळात विरोधी महिला नगरसेविका थेट व्यासपीठावर धडकल्या. निधी वाटपात महापौर पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. इतरांच्या निधीला कात्री लावून भाजप सदस्यांची नियमबाह्य़ कामे केली जात असल्याची तक्रार करत विरोधी सदस्यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी, व्यासपीठावरील गोंधळ यामुळे महापौरांनी सर्व विषयांना मंजुरी देत सभागृहाचे कामकाज गुंडाळले. विषय पत्रिकेवरील महिला, बाल कल्याण समितीच्या सदस्यांची नावे नियुक्तीच्या पहिल्याच विषयावर चर्चा सुरू असताना हा गदारोळ उडाला.

विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही

निधी वाटपात कोणताही पक्षपातीपणा केलेला नाही. मुळात स्थायी समिती, प्रभाग समिती, सर्वसाधारण सभा यामध्ये जी कामे मंजूर झाली, ज्या कामांचे आदेश दिले गेले, त्यांना या वर्षांतील अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आले. ही कामे पूर्ण करताना प्रशासनाशी भांडावे लागणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून सदस्यांचे प्रस्ताव मंजूर करावे, असा विरोधकांचा आग्रह होता. सदस्यांचे प्रस्ताव आपण स्वीकारत नाही. यापूर्वी मंजूर झालेले काही प्रस्ताव राहिले असल्यास ते समाविष्ट करण्याची तयारी दर्शविली. विरोधकांचे आरोप तथ्यहीन आहेत.

      – रंजना भानसी, महापौर

भाजपकडून सत्तेचा गैरवापर

महिला बाल कल्याण समितीसाठी १९ टक्के निधी राखीव असतो. हा निधी कोणत्या कोणत्या कामासाठी वापरायचा याचे काही निकष आहेत. सत्ताधारी भाजपने नियमांना बगल देत आपल्या नगरसेवकांची ग्रीन जीम उभारणे, सभागृह बांधणे अशी नियमबाह्य़ कामे समाविष्ट केली. त्यास शिवसेनेने कडाडून विरोध दर्शविला. भाजप स्वत:च्या नगरसेवकाच्या एकेका प्रभागात २० ग्रीन जीम उभारीत आहे. महिला बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. नियमात न बसणाऱ्या कामांबद्दल  आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी नियमबाह्य़, चुकीची कामे केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

      – विलास शिंदे , गटनेता, शिवसेना</strong>