महापौर पदासाठी भाजपमध्ये चुरस, सेना नेते राज ठाकरेंशी चर्चा करणार

नाशिक : महापालिकेत बहुमत असणाऱ्या भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीत काही नगरसेवक फुटण्याच्या भीतीने मनसेची मदत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गोव्यात सहलीला गेलेल्या भाजप नगरसेवकांशी गिरीश महाजन यांनी चर्चा केली. महापौरपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून जो अधिकचे संख्याबळ जमवेल, त्याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनादेखील मनसेला महाआघाडीत सहभागी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे.

महापौर पदाची निवडणूक शुक्रवारी होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अंतिम मुदत आहे. महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये सतीश कुलकर्णी, दिनकर पाटील, उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, शशिकांत जाधव, हिमगौरी आडके असे अनेक इच्छुक आहेत. यातून एकाची निवड करताना माजीमंत्री गिरीश महाजन यांची दमछाक होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने आपल्या नगरसेवकांना कोकणमार्गे गोव्याला मार्गस्थ केले. माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक सात ते आठ नगरसेवक सहलीत सहभागी झाले नाही. हे नगरसेवक विरोधात गेल्याचे मानत भाजप ६१चा जादुई आकडा गाठण्याच्या तयारीला लागला आहे.

अपेक्षित संख्याबळ गाठून देणाऱ्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली जावू शकते. जादुई आकडा गाठण्यासाठी कमी पडणारे संख्याबळ मनसे, अपक्ष किंवा इतर पक्षातून भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचा एक भाग म्हणून भाजपचे उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे यांनी मनसेच्या राजगड कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मनसेचे गटनेते सलीम शेख, अनंता सूर्यवंशी उपस्थित होते. मनसेचे पाच नगरसेवक आहेत. त्याची रसद मिळाल्यास भाजपला सत्ता राखणे सुकर होईल. परंतु, मनसेने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. भाजपने संख्याबळ कायम राखण्यासाठी शक्य त्यांच्याशी चर्चा करण्याचे धोरण आखले आहे. महापौर पदासाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. त्यातील काही इच्छुक सकाळी शहरात परतले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी गोव्यात सहलीला गेलेल्या नगरसेवकांशी चर्चा सुरू केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. सर्वाशी चर्चा करून अखेरच्या क्षणी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.

दुसरीकडे शिवसेना शांतपणे आपली खेळी खेळत असून महापौर निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप सक्रिय झाले आहेत. भाजपच्या सहलीत सहभागी होण्यास नकार देऊन सात ते आठ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामागे सानप यांची खेळी असल्याचे सांगितले जाते. राज्यातील सूत्र पालिकेत वापरून भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न आहे. सेनेकडून महापौर पदासाठी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर हे इच्छुक असले तरी अद्याप एका नावावर सहमती झालेली नाही.

महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीला मनसेने साथ द्यावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने मुंबईत मनसेच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. नंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. महाआघाडीच्या उमेदवाराचे नाव बुधवारी निश्चित होईल. उमेदवार निवडीवरून सेनेत कोणतेही मतभेद नाहीत. सर्व इच्छुक एकत्रितपणे काम करत आहेत.

– भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख, शिवसेना)