अनेक पक्षांकडे कार्यकर्ते नाहीत, केवळ नेत्यांच्या भरोशावर ते महापालिकेवर डोळा ठेवून आहेत. शिवसेनेकडे शिवसैनिकांची फौज आहे. त्यामुळे कोणी १०० हून अधिक जागा मिळवण्याचे स्वप्नरंजन करत असले तरी तसे काही नसून महापालिकेवर बहुमताने सेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वानी तयारीला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. अजय चौधरी यांनी केले. शिवसेना सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त रविवारी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी सेना पदाधिकाऱ्यांनी भाजपने पालिका निवडणुकीसाठी केलेल्या ‘१०० प्लस’ घोषणेची पुन्हा एकदा खिल्ली उडविली. मराठी माणूस व त्याची अस्मिता, हिंदुत्व, सीमा प्रश्न आंदोलन, शेतकऱ्यांचा विकास या मुद्दय़ांवर शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त पक्षाची वाटचाल, विचार, कार्य, उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यानिमित्त संपूर्ण शहर भगवेमय केले जाईल. सर्व शाखांमध्ये सेनेच्या यशस्वी आंदोलनाची माहिती दिली जाईल. तसेच शिवजल क्रांती योजना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, शिवप्रकाश-सौरऊर्जा आदी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन चौधरी यांनी केले. नाशिक महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर बहुमताने सेनेचा झेंडा फडकणे आवश्यक आहे. त्यासाठी पक्षाचे कार्य घराघरांत पोहोचवून नागरिकांचा विश्वास संपादित करावा. जनतेचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

शिवसेना सत्तेत असली तरी पक्षाची बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत असूनही नाशिकच्या जनतेसाठी शिवसेनेने मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला होता, याचाही उल्लेख त्यांनी केला. बैठकीस आ. राजाभाऊ वाजे, आ. योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.