आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर १० दिवसांनी प्रशासनाशी चर्चा

परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्ह्य़ात ४ नोव्हेंबरला युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. नंतर राज्यात सत्तास्थापनेच्या धडपडीत असणाऱ्या सेनेला या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यास सवड मिळाली नाही. याच काळात आदित्य यांनी आश्वस्त केलेल्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अखेर आदित्य यांच्या दौऱ्यानंतर १० व्या दिवशी शिवसेनेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आठवण झाली.

सेनेच्या शिष्टमंडळाने पंचनामे, शासकीय मदत, सक्तीने वीज देयक वसुली आदींबाबत जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. शेतकऱ्यांना मिळणारी मदत कर्जखात्यात जमा होऊ नये, जिल्हा बँकेस शेतजमिनींच्या लिलावास प्रतिबंध करावा, अशी मागणी करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार, याबद्दल साशंकता आहे.

सत्तास्थापनेतील तिढय़ामुळे सेनेचे आमदार, प्रमुख पदाधिकारी मुंबईत अडकून पडले. शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या घटनाक्रमाने शेतकऱ्यांसह सामान्यांमधून रोष व्यक्त होत असताना आता राजकीय पक्षांनी नुकसानग्रस्तांकडे लक्ष वळविले आहे. त्याची प्रचीती सेनेच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या भेटीतून आली. सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवा सेनेचे शीतल देवरुखकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पंचनाम्याचे काम ९५ टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करावे. जी शासकीय मदत दिली जाईल, ती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा न करता थेट वैयक्तिक बँक खात्यात जमा करावी. जिल्हा बँक थकबाकीदारांच्या जमिनींचे लिलाव करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यास प्रतिबंध करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. पंचनामे पूर्ण करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पुढील काळात असे प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने द्राक्ष, ऊस, डाळिंब आदी फळबागांना एकरी एक लाख, तर इतर पिकांसाठी एकरी ५० हजार रुपये अशी मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर प्रशासनाची भेट घेण्यात कोणताही विलंब झालेला नाही. कारण, त्या दौऱ्यानंतर शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची फौज तालुकानिहाय काम करत होती. आठ दिवस शेताच्या बांधावर जाऊन माहिती घेतली गेली. त्याचा आढावा घेतल्यानंतर सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. मालेगावच्या दाभाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या करावे हे दुर्दैवी आहे. आदित्य ठाकरे ज्या ज्या ठिकाणी गेले, तिथे त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले होते. पुढील काळात शिवसैनिकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दाभाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची आम्ही लवकरच भेट घेऊन शक्य ती मदत करणार आहोत. – भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख, शिवसेना)