राज्यात व केंद्रात शिवसेना सत्ताधारी असली तरी त्यांची पत नाही. त्यामुळे सेनेने कोणतीही आश्वासने दिली तरी ते पूर्ण करणार नाहीत, असे टिकास्त्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोडले. भगूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी भगूर येथे मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

[jwplayer zkvFlBpu]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सध्या एकटय़ा धनंजय मुंडे यांच्यावर आहे. पहिल्या टप्प्यात मुंडे हे ठिकठिकाणी सभा घेत असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अद्याप प्रचारात सहभागी झालेले नाहीत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलीक यांची मनमाड येथे तर मुंडे यांची भगूर येथे सभा झाली.

भगूर नगरपालिकेवर मागील १६ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. हा संदर्भ घेऊन मुंडे यांनी सावरकरांच्या गावातील लोक इतक्या वर्षांपासून काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असल्याचे सांगितले.

सेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या कुटुंबाकडे सत्ता देऊन स्थानिकांना काय मिळाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात शिवसेना प्रचारात जातीच्या आधारे मते मागत असल्याचे म्हटले होते. हा धागा पकडून मुंडे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राचा दाखला दिला.

मराठा क्रांती मोर्चाविषयी शिवसेनेने ‘सामना’मधून टीका केली होती. त्यांना नागरिक मतदान करणार काय, असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला.

[jwplayer izOWW4O7]