पक्षाचे झेंडे, चिन्ह घेऊन राजकारणी मदतीसाठी धावले; संस्थांचे मात्र, सामाजिक हिताकडे लक्ष

हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँकांबाहेर रांगा लावणाऱ्या नागरिकांच्या मदतीला राजकीय पक्षांसह काही सामाजिक संस्थाही धावून गेल्याचे चित्र शहरासह जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात दिसत आहे. अर्थात, राजकीय पक्षांकडून होणाऱ्या मदतीमागे शहरात होणाऱ्या महापालिका निवडणुकीची पाश्र्वभूमी असल्याने त्यांच्याकडून पक्षाचे झेंडे, चिन्ह मदतीच्या ठिकाणी मिरविले जात आहे. दुसरीकडे, सामाजिक संस्थांकडून मात्र मिरविण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

संबंधित नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यापासून नागरिकांना बँक, टपाल कार्यालयांसमोर रांगेत उभे राहणे हे एकच काम उरले. दररोज सकाळपासूनच बँका आणि टपाल कार्यालयांसमोर लागलेल्या रांगा दिसू लागल्या. त्यात शनिवार आणि रविवार या सुटींच्या दिवसाचाही अपवाद उरला नाही. सोमवारी गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने बँका आणि टपाल कार्यालये बंद ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना एक दिवसाची उसंत मिळाली आहे.

राजकीय पक्षांकडून रांगांमध्ये उभे असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी चाललेल्या धडपडीचे स्वागत करण्यात आले असले तरी महापालिका निवडणुकीची पाश्र्वभूमी नसती तर राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मदतीसाठी असा तातडीने पुढाकार घेतला गेला असता काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या समस्यांची दखल राजकीय पदाधिकारी याप्रमाणे कायम घेत गेल्यास कोणत्याही निवडणुकीसाठी त्यांना प्रचाराचीही गरज राहणार नाही. असे कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी नागरिक समर्थपणे उभे राहतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

राजकीय पक्षांच्या सेवा केंद्रांचा नागरिकांना लाभ

नाशिक शहरातही बँक आणि टपाल कार्यालयांबाहेर लागणाऱ्या रांगांमधील नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेनेसह भाजप, मनसेचे कार्यकर्ते मैदानात उतरले. परंतु, त्यांच्या या मदतीकडे राजकीय दृष्टिकोनातूनच पाहिले गेले. महापालिकेची आगामी निवडणूक हे त्यासाठी कारण ठरले. याशिवाय कोणत्या पक्षाच्या वतीने मदत करण्यात येत आहे त्याचा गवगवा होण्यासाठी पक्षाचे झेंडे, चिन्ह यांची पेरणी त्या त्या ठिकाणी करण्यात आल्याचेही कारण त्यासाठी पूरक ठरले. शिवसेनेच्या वतीने मदतीसाठी ठिकठिकाणी सेवा केंद्र सुरू करण्यात आले. कित्येक तास रांगेत उभे राहिल्याने अनेकांना तहान लागली. परंतु, रांगेतून बाहेर पडल्यावर नंबर जाण्याची भीती असल्याने बरेच जण तहान-भूक लागली असतानाही रांगेत उभे राहिले. अशा मंडळींना या सेवा केंद्रामार्फत पिण्याचे पाणी देणे, नोटा जमा करण्यासाठी लागणारी पावती भरून देणे, रांगेत उभे राहून कोणाला तब्येतीचा त्रास जाणवू लागल्यास तातडीने वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिका तयार ठेवणे या स्वरूपात मदत करण्यात आली. शिवसेना मध्य नाशिकच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित सेवा केंद्रामार्फत महानगरप्रमुख अजय बोरस्ते, संगीता देसाई, गोकुळ पिंगळे आदींच्या उपस्थितीत लोकांना पाण्यासह बिस्कीट देण्यात आले. पंचवटी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी फिरत्या गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. सातपूर, नाशिकरोड, आर्टिलरी सेंटर या सर्व इतर सर्वच ठिकाणी अशी सेवा केंद्रे सुरू झाल्याचे दिसून आले. भाजप आणि युवा मोर्चा यांच्या वतीने नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी बँकांपुढे उभ्या असलेल्या नागरिकांना पाणी वाटप करण्यात आले. याशिवाय जय भवानी रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुच्र्याची व्यवस्था करण्यात आली.

संस्थांनी सामाजिक उपक्रमाचा वसा जोपासला

ग्रामीण भागात तर सकाळी सात वाजेपासूनच हजारो नागरिक विविध बँकांसमोर रांगेत कडाक्याच्या थंडीत तहान-भूक विसरून उभे असलेले दिसले. रांगेतील लोकांचा नंबर कधी लागेल हे सांगता न येणारे असल्याने घोटीत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भोर, प्रहार अपंग सेवा समितीचे तालुकाध्यक्ष गोपाळ शिंदे यांनी स्वखर्चाने ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी, महिला, लहान बालक यांना मोफत वडापाव देत उपाशीपोटी नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. यावेळी सहकारी हेमंत लहामगे, हरिभाऊ  कडाळे उपस्थित होते. सामाजिक संस्थांच्या या उपक्रमाचे रांगेतील सर्वानीच स्वागत केले. जोपर्यंत नोटा बदलण्यासाठी रांगा लागत राहतील तोपर्यंत अशा संस्था व संघटनांनी अन्नदान, पाणीवाटप असे उपक्रम आयोजित करावेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.