शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यात निमंत्रित शिवसेनेला स्थानिक कार्यक्रमातून डावलले

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी गुरुवारी येथे आयोजित गोदावरी नदीच्या जल संकलन कार्यक्रमापासून भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात दूर ठेवले. मुंबईतील भूमिपूजन सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या शिवसेनेला डावलून भाजपने या सोहळ्याचा चांगलाच गाजावाजा करत आपल्या प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याची संधी साधल्याचे पाहावयास मिळाले.

शनिवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, यावरून आधीच वाद झाले. सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाल्यावर अखेर त्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. या स्मारकाचे श्रेय एकटय़ा भाजपला मिळावे, अशी व्यूहरचना केली गेली आहे. त्याचे प्रत्यंतर स्थानिक पातळीवरील कार्यक्रमात आले. शिवसेनेच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपने दिले नाही.

भाजपने या सोहळ्याचे जोरदार विपणन चालविले आहे. त्यासाठी पालकमंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची फौज जुंपताना दुसरीकडे शासकीय यंत्रणेमार्फत उपरोक्त कार्यक्रमाचा यथायोग्य प्रचार होईल, याचे नियोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून चाललेला वाद नुकताच शमला, परंतु सेनेला फारसे महत्त्व द्यायचे नाही, अशी भाजपची रणनीती आहे, असे या कार्यक्रमातून दिसून आले. मुंबईतील सोहळा संस्मरणीय ठरावा, यासाठी राज्यातील ७० हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरील माती नेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. याबाबत माहिती देऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सोहळ्यास नागरिकांना निमंत्रित करतात. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देणे टाळत असल्याचा प्रत्यय या वेळी दिसून आला. भूमिपूजन सोहळ्यासाठी गोदावरी व दारणा नदीचे जल संकलन कार्यक्रमात शिवसेनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे कार्यक्रमातून अधोरेखित झाले. बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे या भाजप आमदारांच्या उपस्थितीत गुरुवारी रामकुंड येथे ढोल-ताश्यांच्या गजरात जल संकलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी गोदावरीची महाआरती व विधिवत पूजन करण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची मांदियाळी लक्षणीय होती. कलशात जल संकलित केल्यानंतर शहरात शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि भाजपचे पक्षचिन्ह असणारे चित्ररथ घेऊन गाजावाजा करत फेरी काढण्यात आली. ध्वनिक्षेपकामार्फत नागरिकांना निमंत्रण देण्यात आले. जिल्ह्य़ातील किल्ल्यांची माती आणि गोदावरी-दारणा नदीचे जल गुरुवारी रात्री रथातून मुंबईला नेले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या सोहळ्याद्वारे भाजपने सेनेवर कुरघोडी साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

स्वतंत्रपणे कोणाला निमंत्रण नाही

गोदावरी जल संकलन हा सार्वजनिक कार्यक्रम होता. त्याचे निमंत्रण स्वतंत्रपणे कोणाला देण्यात आले नाही. शहरातील नागरिक उत्स्फूर्तपणे या सोहळ्यात सहभागी झाले. भाजपच्या प्रयत्नामुळे शिव स्मारकाच्या कामास सुरुवात होत आहे. शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार असल्याने भाजपने जय्यत तयारी केली आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्य़ातून हजारो शिवप्रेमी सोहळ्यास उपस्थित राहतील.

– आ. बाळासाहेब सानप (शहराध्यक्ष, भाजप)

भाजपचे दिखाऊ प्रेम

महापालिका निवडणुका लक्षात घेऊन एखाद्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’प्रमाणे भाजपने जल संकलन कार्यक्रम आयोजित केला. मराठा आरक्षणावरून राज्यात निघालेल्या मूक मोर्चामुळे उशिरा का होईना, भाजपला शिवाजी महाराजांची आठवण झाली. शिवाजी महाराज हे कोणत्या एका पक्षापुरते मर्यादित नाहीत. भूमिपूजन सोहळ्यास किल्ल्यांवरील माती नेताना भाजपला साल्हेर-मुल्हेरचा विसर पडला. भाजपचे शिवाजी महाराजांवरील प्रेम दिखाऊ आहे.

– अजय बोरस्ते (महानगरप्रमुख, शिवसेना)