संजय राऊत माध्यमांवर घसरले

सेनेत स्थानिक पातळीवर कोणतेही वाद नाहीत. काही माध्यमे जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत. महापालिकेपुरता विचार केल्यास तुमच्या पत्रकारितेचा राज्यस्तरावर विकास होणार नाही, असे बोल सुनावत शिवसेनेचे खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत हे माध्यमांवरच घसरले.

शिवसेना कार्यालयात बुधवारी सकाळी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची राऊत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सेनेचे नगरसेवक उपस्थित नव्हते. संघटनात्मक पातळीवर खांदेपालट झाल्यानंतर सेना गटातटांमध्ये विभागली गेली. मागील काही बैठकांमध्ये नगरसेवक दांडी मारत असल्याचे पाहावयास मिळाले. अंतर्गत वादाचे प्रतिबिंब या बैठकीवरही पडले काय, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना धारेवर धरत त्यांचा अभ्यासवर्गच घेतला. आज नगरसेवकांची बैठक नव्हती. सकाळी महापालिकेतील अनेक नगरसेवक भेटून गेले. ही पक्ष संघटनेची बैठक आहे. पक्षाने कोणती बैठक घ्यावी हे पत्रकार ठरवणार नाही. सेनेतील अंतर्गत घडामोडींवर पत्रकारांचे विश्लेषण चुकीचे आहे. काही जण जाणीवपूर्वक तसा अपप्रचार करतात. सेनेत कोणी नाराज नाही. पक्षात विविध पातळीवर स्वतंत्र बैठका होतात, असे त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी ६ मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला येणार आहेत. या दौऱ्यात लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीबाबत बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले.  विधान परिषदेच्या निवडणुकीत युतीसाठी भाजपने शिवसेनेशी चर्चा केली जाणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात विचारले असता राऊत यांनी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सेनेने आपला उमेदवार आधीच जाहीर केला असल्याचे स्पष्ट केले. मागील दोन निवडणुकीत सेनेला निसटता पराभव स्वीकारावा लागला. मतदारसंघात पक्षाची २११ मते असून या वेळी सेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सूचित केले.  नाशिकचे उद्योग विदर्भात किंवा अन्यत्र पळवून नेऊ नका. मुंबईत भाजपचा असा प्रयत्न सेनेने हाणून पाडला. राज्यातील आरोग्य व्यवस्था बिकट झाली आहे. आरोग्य व्यवस्थेची अवस्था मांडत असताना राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सेनेकडे असणाऱ्या आरोग्य खात्याची स्थिती मांडली. ‘कास्टिंग काऊच’बद्दल रेणुका चौधरी यांनी केलेले विधान हा संसदेचा अवमान आहे. तशी संस्कृती काँग्रेसमध्ये असू शकते, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना मंत्रालयात न्यावे

नाशिक महापालिकेतील मालमत्ता करवाढीच्या मुद्यावर शिवसेनेने ठाम भूमिका घेतली आहे. नाशिककरांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपकडून त्यांचे शोषण होत आहे. पालिका आयुक्तपदी कोणाला नेमायचे हा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी वादग्रस्त निर्णय घेतल्याचा इतिहास आहे. अशा अधिकाऱ्यास मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घेऊन जावे. यामुळे राज्याच्या महसुलात खऱ्या अर्थाने वाढ होईल, असा टोला राऊत यांनी लगावला.