शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक एप्रिल महिन्यात येथे होणार असून त्यासंदर्भात मंगळवारी शालिमार येथील मुख्य कार्यालयात आयोजित पूर्वनियोजन बैठकीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

शिवसेनेने काही दिवसांपूर्वी ‘नाशिक वाचवा’ महामोर्चा काढल्यानंतर त्याची दखल घेत भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली. या बैठकीत शिवसेनेवर फारशी टीका करणे भाजपकडून टाळण्यात आले. भाजपच्या या बैठकीनंतर आता शिवसेनेने उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक येथे आयोजित केली आहे.

या संदर्भातील नियोजनाविषयी झालेल्या मंगळवारच्या बैठकीत उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी बैठकीसाठी नाशिकची निवड होणे म्हणजे नाशिककरांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असे यावेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविकात सांगितले. उत्तर महाराष्ट्र बैठकीत शेतकरी, उद्योजक, बेरोजगार यासह संघटनात्मक बांधणी, पुढील राजकीय वाटचाल याविषयीही वक्ते मार्गदर्शन करतील. दिवसभराच्या शिबिराचा समारोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. शिबिराच्या आयोजन तयारीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे संपर्कप्रमुख आ. अजय चौधरी यांनी नमूद केले. यावेळी खा. हेमंत गोडसे, उपनेते बबन घोलप यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीत सत्यभामा गाडेकर, ज्योती देवरे, मंगला भास्करे, मंदा गवळी आदींचा चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठक?ीस माजी महापौर विनायक पांडे, शिवाजी सहाणे, विलास शिंदे, माजी महापौर यतीन वाघ आदी उपस्थित होते.