बस स्थानक नूतनीकरणासाठी निधी
शहरातील दुर्लक्षित आणि अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या सीबीएस व मेळा स्थानकांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध केल्यानंतर स्थानिक खासदार आणि आमदार यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. या स्थानकाच्या दुरवस्थेची माहिती घेऊन त्यांच्या नूतनीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे भाजपचे स्थानिक आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आधीच म्हटले होते. आता नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी या स्थानकांची दुरवस्था परिवहनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या कामासाठी एकूण सहा कोटींचा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. राज्यात व केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या पक्षांमध्ये श्रेय घेण्यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे.
शहरातील सीबीएस व मेळा ही सर्वात जुनी बसस्थानके. सीबीएस स्थानकाला अनेक वर्षे झाली आहेत. देखभाल व दुरुस्तीअभावी ते मोडकळीस आले आहे. या स्थानकावरील अस्वच्छता प्रवाशांची नेहमीची डोकेदुखी. ही बाब आपण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे गोडसे यांनी सांगितले. त्यामुळे त्याची तात्काळ दखल घेऊन सीबीएसच्या नूतनीकरणासाठी एक कोटी तर मेळा बस स्थानकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या अनुषंगाने खा. गोडसे यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अंदाजपत्रके तयार करण्यास सूचित केले. त्यानुसार शासनाने वास्तुशास्त्रज्ञांची नियुक्ती करून आराखडा तयार केला. महामंडळाचे विभागीय अभियंता री. क. काझी तसेच वास्तुशास्त्रज्ञ प्रशांत कुलकर्णी व इतर अधिकारी यांच्या सोबत खा. गोडसे यांनी जुने सीबीएस व मेळा बसस्थानकाची नुकतीच पाहणी करून आराखडय़ाची माहिती घेतली. त्यातील काही त्रुटींवर बदल सूचविले. सीबीएसच्या नूतनीकरणात अस्तित्वातील इमारतीवरील मोडकळीस आलेला भाग काढून त्यावर चारही बाजूने उत्कृष्ट एलिव्हेशन करणे, १३ बसेस थांबण्याची व्यवस्था, प्रवासी बैठक व्यवस्था, रिझव्‍‌र्हेशन पास कक्ष, चालक-वाहक विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष आदी सोयी अद्ययावत करण्यात येणार आहेत. तसेच बस स्थानकावर इलेक्ट्रॉनिक डिजिटल बोर्ड करणे, खासगी वाहनांसाठी वाहनतळ तसेच नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्यात आकर्षक संरक्षक भिंत, हिरवळ आदी करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मेळा स्थानकासाठी सुमारे तीन एकर क्षेत्रात अद्ययावत बसस्थानक उभारणी प्रस्तावित आहे. त्यासाठी चार कोटी निधी मंजूर झाला आहे. प्राथमिक नियोजनानुसार २० बस थांब्यांचे स्थानक असणार असून येथे सुमारे २०० चालक-वाहकांसाठी अद्ययावत विश्रांतीगृह राहील. मुक्कामी येणाऱ्या बससाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी उपरोक्त बसस्थानकांसाठी राज्य शासनाने हा निधी मंजूर केल्याची माहिती भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली होती. त्यांनी या बसस्थानकांना भेट देऊन त्याची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून नुतनीकरणासाठी निधी मिळवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. नूतनीकरणाच्या मुद्दय़ात श्रेय घेण्यावरून भाजपच्या आमदार आणि शिवसेनेचे खासदार यांच्यात स्पर्धा सुरू झाल्याचे अधोरेखित झाले आहे.