जिल्ह्यतील इगतपुरी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत अडीच दशकांपासूनची आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले असताना दुसरीकडे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपने शिवसेनेसह काँग्रेसची तीच अवस्था केली. इगतपुरीच्या नगराध्यक्षपदी सेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगांवकर विजयी झाले. इगतपुरी शिवसेनेने १३ जागाजिंकून तर त्र्यंबकमध्ये भाजपने १४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. दरम्यान, सटाणा नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच अ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीने भाजप-शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला.

भाजपच्या अंतर्गत नाराजीचा लाभ

इगतपुरी : भाजपच्या अंतर्गत नाराजीचा लाभ उठवत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह १८ पैकी १३ जागा जिंकून इगतपुरी नगरपालिकेवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. भाजप नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्यांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपला धक्का देणारा ठरला. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी सेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सेनेने निवडणूक लढविली होती. कोणताही बडा नेता प्रचारासाठी आला नसताना सेनेने ही किमया साधली. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मतदारांनी नाकारले.

इगतपुरी नगरपालिका निवडणुकीविषयी जिल्ह्यात उत्सुकता होती. शिवसेना-रिपाइंने २५ वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखली. १८ पैकी १३ जागा तसेच नगराध्यक्षपदावरही विजयी होऊन सेनेने एकहाती वर्चस्व कायम राखले. प्रथमच स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेशी दोन हात करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला इगतपुरीकरांनी साफ नाकारले. काँग्रेस, भारिपचा सुपडा साफ झाला. शिवसेनेने तिकीट नाकारलेला एक जण अपक्ष विजयी झाला. बहुचर्चित नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेनेचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजपच्या फिरोज पठाण यांचा दारुण पराभव केला. बहुजन विकास आघाडीचे महेश शिरोळे, काँग्रेसचे बद्रीनाथ शर्मा, भारिप बहुजन महासंघाचे बाळू पंडित, अपक्ष राजू कदम आणि महमद मेमन यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले. नऊ प्रभागातील १८ जागा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या मतांची मोजणी इगतपुरीत पार पाडली. इगतपुरीच्या इतिहासात ऐतिहासिक निकाल लागले असून इगतपुरीकरांनी चार जणांना पुन्हा नगरसेवकपदाची संधी दिली आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी ७९ उमेदवार रिंगणात होते. ६८.५३ टक्के मतदान इगतपुरीकरांनी केले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मिरवणूक काढली. शिवसेनेचे १३, भाजपचे चार तर एक अपक्ष निवडून आला.

विजयी झालेले उमेदवार

नगरसेवक पदाच्या १८ पैकी १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये प्रभाग एकमधून युवराज भोंडवे, प्रभाग दोनमधून किशोर बगाड आणि रोशनी परदेशी, प्रभाग तीनमधून आरती कर्पे,  प्रभाग चारमधून सुनील रोकडे आणि मिना खातळे, प्रभाग पाचमधून उमेश कस्तुरे, प्रभाग सहामध्ये उज्वला जगदाळे, प्रभाग सातमधून आशा सोनवणे आणि गजानन कदम, प्रभाग आठमधून सीमा जाधव आणि नईम खान, प्रभाग नऊ मधून रंगनाथ चौधरी यांचा समावेश आहे. भाजपच्या अर्पणा धात्रक प्रभाग क्रमाक एकमधून तर प्रभाग पाचमधून साबेरा पवार, प्रभाग सहामध्ये दिनेश कोळेकर आणि प्रभाग नऊमधून गीता मेंगाळ हे विजयी झाले. प्रभाग तीनमधून अपक्ष उमेदवारी करणारे संपत डावखर विजयी झाले.