नाशिक : महापालिकेच्या शहर बस सेवेत पर्यावरणस्नेही बीएस-सहाऐवजी बीएस-चार प्रकारातील बसगाडय़ांचा वापर होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यास शिवसेनेकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासन पर्यावरणस्नेही बसऐवजी प्रदूषणकारी बसचा अट्टहास धरत असल्याने बीएस-चार बसची नोंदणी करू नये, अशी मागणी शिवसेनेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे.

महापालिका चालू वर्षांत शहरात बस सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी आणि डिझेल अशा तीन प्रकारच्या बसगाडय़ांचा वापर केला जाणार असून त्या ठेकेदाराकडून उपलब्ध केल्या जाणार आहेत.

केंद्र सरकारने ३१ मार्च २०२० पासून बीएस-चार वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे ठरविले आहे. त्याऐवजी बीएस-सहा प्रकारातील वाहनांची निर्मिती होणार आहे. महापालिकेकडून वापरल्या जाणाऱ्या १५० बस बीएस-चार प्रकारातील आहेत. या संदर्भात प्रक्रिया राबवितांना अशोक लेलँड या कंपनीच्या पत्रानुसार अटी-शर्तीत बदल करून बीएस-चार प्रकारातील बस वापरण्याची धडपड केली गेल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. पालिका प्रशासनाने यासंबंधीची सर्व कागदपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करीत नियम, अटी निश्चित करतांना, निविदापूर्व बैठकीवेळी वाहनांसाठी बीएस-सहा प्रकाराचा निकष नव्हता. आजपर्यंत एसटी महामंडळ आणि कोणत्याही महापालिकेने बीएस-सहा प्रकारच्या बसची मागणी केलेली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

बसगाडय़ा प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी थेट त्या कार्यालयात धाव घेऊन या बसची नोंदणी न करण्याची मागणी केली. स्मार्ट बसच्या नावाखाली महापालिका प्रदूषणकारी वाहनांची नोंदणी करत आहे. त्यांची नोंदणी करू नये, अन्यथा नियमबाह्य़ वाहने नोंदणी करण्याबाबत कायदेशीर प्रक्रियेला कार्यालय जबाबदार राहील, असा   इशारा तिदमे यांनी दिला. बसची नोंदणी महापालिकेच्या नांवावर केली जात नाही. ती ठेकेदार म्हणून नोंद होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

नोंदणी होणारच

बीएस-चार प्रकारातील वाहनांची एक एप्रिल २०२० पासून नोंदणी बंद होणार आहे. तत्पुर्वी त्यांची नोंदणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. उपरोक्त मुदतीआधी सीएनजी बसगाडय़ांची नियमानुसार नोंदणी होत आहे. पहिल्या दिवशी सुमारे २५ गाडय़ांचे अर्ज आले.

– प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक