मराठा हायस्कूलमध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते टॅब वितरण

शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करण्याचा प्रस्ताव राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मांडला होता. तथापि, त्या विभागाकडून कोणतीही कृती न झाल्यामुळे अखेरीस शिवसेनेने मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांंना टॅब देण्याचा कार्यक्रम हाती घेतला, असे सांगत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या मंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. मुंबईतील ४८० शाळांमध्ये ‘व्हच्र्युअल क्लासरूम’ आणि दहा हजार विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात आले आहे. नवनीतकडून पुस्तकांचे स्वामित्व हक्क घेऊन शालेय पुस्तके टॅबमध्ये उपलब्ध करून दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मराठा हायस्कूलमध्ये १०० विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी शहरातील प्राचीन वारसा असलेल्या सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण आणि केंद्रीय राष्ट्रीय अभियानांतर्गत शंभर खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते. ‘शिवसेना नाशिकचे डिजिटल टेकऑफ’ संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. आदित्य यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून टॅब वापरण्याविषयी मार्गदर्शन केले. शाळेत अभ्यास सोडून असे काही कार्यक्रम झाल्यास त्यात सहभागी व्हायला सर्वाना आवडते. त्यावेळी काही जण मागील बाकावर बसतात. का तर झोप चांगली लागते, असे त्यांनी सांगितल्यावर विद्यार्थी वर्गात हशा पिकला. भ्रमणध्वनीचा किती विद्यार्थी वापर करतात, इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी किती वह्या-पुस्तके सोबत आणतात याची विचारणा करत त्यांनी टॅबच्या माध्यमातून दप्तराचे वजन कसे कमी करता येईल हे समजावून सांगितले. मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी विषयाची सर्व पुस्तके टॅबमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पुस्तके आणण्याची गरज नाही. केवळ वह्या आणि टॅब घेऊन ते शाळेत येऊ शकतात. त्याद्वारे वर्गात आणि घरीही चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल, असे त्यांनी सूचित केले.

टॅबचा वापर कसा करायचा हे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बाकांवर बसत समजावून दिले. कोणत्या विषयाचे पुस्तक उघडायला आवडेल, या प्रश्नावर काही विद्यार्थ्यांनी गणित हे उत्तर दिले. यावर त्यांनी आश्चर्यकारक मुद्रा करत हा अवघड विषय असल्याचे दर्शवले. यामुळे विद्यार्थ्यांना हसू रोखता आले नाही. हसतखेळत त्यांनी विद्यार्थ्यांच्या गटागटाला टॅबची प्राथमिक माहिती दिली. टॅबबद्दल विद्यार्थी वर्गात कमालीची उत्सुकता होती. काही शंका उपस्थित करत त्यांनी समाधान करून घेतले. प्रातिनिधिक स्वरूपात दहा विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत ‘सेल्फी’ काढण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना महानगरप्रमुख बोरस्ते यांनी विशद केली. शहरातील वेगवेगळ्या प्रभागात सेना नगरसेवकांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस पवार यांनी दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत बरीच चर्चा होते असे नमूद करत ही बाब प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे कार्य या उपक्रमातून साध्य झाल्याचे सांगितले.

शिवसैनिकांना शाब्दिक छडय़ा

कार्यक्रम स्थळ अर्थात मराठा हायस्कूलचे सभागृह तुलनेत लहान होते. व्यासपीठाभोवती शिवसैनिकांनी इतकी गर्दी केली की सभागृहातील विद्यार्थी दिसेनासे झाले. यामुळे सभागृहात गोंधळ वाढला. अखेर युवा सेना प्रमुख आणि महानगरप्रमुखांना शाब्दिक छडय़ा द्याव्या लागल्या. कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी असल्याने शिवसैनिकांनी सभागृहाबाहेर जावे असे आवाहन बोरस्ते यांनी केले. शिवसैनिक बाहेर गेले नाहीत तर दहावीच्या परीक्षेला बसवू असे आदित्य यांनी सुनावले. नेत्यांच्या शाब्दिक छडय़ांनी काही शिवसैनिक बाहेर गेले तर काही मागील बाजूस सरकले

‘युटिलिटी पेमेंट’ची मुदत वाढवा

५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेने याबाबतची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. या एकंदर स्थितीत २४ नोव्हेंबपर्यंत सीमित असणारी ‘युटिलिटी पेमेंट’ अर्थात पेट्रोल पंप, रुग्णालये, औषध दुकाने या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत ३० डिसेंबपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.