News Flash

बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळेंना लाच घेताना अटक

सभापतीपदी निवड झाल्यापासून त्यांचा बाजार समितीवर एकछत्री अंमल सुरू झाला होता.

लाचलुचपत प्रतिबंधकच्या घेऱ्यात शिवाजी चुंबळे.

तीन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यास पुन्हा कामावर घेण्याकरिता सहा लाख रुपयांची लाच मागून त्यातील तीन लाख रुपये स्वीकारताना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या आवारात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, याच बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची रक्कम घरी नेताना कारवाई झाली होती. या घटनेने बाजार समितीचा वादग्रस्त कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

माजी सभापती पिंगळेंवर कारवाई झाल्यानंतर समितीवर शिवाजी चुंबळे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. सभापतीपदी निवड झाल्यापासून त्यांचा बाजार समितीवर एकछत्री अंमल सुरू झाला होता.

समितीत काही महिन्यांपूर्वी १० कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने रुजू करण्यात आले होते. नंतर त्यांना काढून टाकण्यात आले. संबंधितांना पुन्हा कामावर घेण्यासाठी चुंबळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. या विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचला. तक्रारदार आणि चुंबळे यांच्यात वाटाघाटीअंती सहा लाखांवर तडजोड झाली. त्यातील तीन लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना चुंबळेंना पथकाने रंगेहाथ पकडल्याची माहिती या विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.

समितीत कामावरून पूर्वी काढून टाकलेले तीन ते चार कर्मचारी रुजू झाले आहेत. उर्वरित काहींना घेतलेले नव्हते. यामागे आर्थिक कारण असू शकते. त्याची पूर्तता करण्यास तक्रारदारास सांगितले गेले होते. या संपूर्ण प्रकरणाची तपासात स्पष्टता होईल, असे कडासने यांनी सांगितले. चुंबळे यांचे कार्यालय, घरासह मालमत्ता छाननीचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुरू केले आहे.

दरम्यान, बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावरही सुमारे तीन वर्षांपूर्वी कारवाई झाली होती. कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची रक् कम पिंगळेंच्या घरी नेली जात असताना पकडण्यात आली. त्या प्रकरणात पिंगळेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असताना बाजार समितीचे दुसरे सभापती शिवाजी चुंबळे हे देखील नोकरीसाठी पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.

या कारवाईमुळे बाजार समितीच्या आवारात खळबळ उडाली आहे. या विषयावर संबंधितांपैकी कोणी बोलण्यास तयार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 12:34 am

Web Title: shivaji chumble arrested for taking bribe abn 97
Next Stories
1 पुरामुळे खरीप कांदा बाजारात येण्यास विलंब
2 गोदा प्रकल्पाच्या आराखडय़ात फेरबदल
3 आरोग्यदायी सिगारेट ते शेवग्याच्या च्यवनप्राशपर्यंत
Just Now!
X