व्याख्यान, मान्यवरांचा सत्कार, शोभायात्रा, शिवप्रतिमा, पुतळ्यांना पुष्पहार अशा विविध कार्यक्रमांनी उत्तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बिटको हायस्कूलच्या प्रांगणातील पुतळ्यास, शिवाजी उद्यानातील पुतळ्यास आणि मनपा मुख्यालयातील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यRमास उपायुक्त विजय पगार, हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, शहर अभियंता सुनिल खुने आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मराठा हायस्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक योगराज चव्हाण, पर्यवेक्षक अरुण पवार उपस्थित होते. इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी समृध्दी मोगलने शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. पिंगळे यांनी महाराजांच्या ठिकाणी ज्या अनेक सदगुणांचा संगम होता त्यामुळे हाताशी नाममात्र साधने असतांनाही त्यांच्या भोवतालच्या बलदंड जुलमी शक्तींशी युक्तीने झुंज देऊन स्वराज्याची निर्मिती केल्यामुळे स्वकियांबरोबरच परकियांनी देखील त्यांचे अलौकिकत्व मान्य केल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन विजय म्हस्के यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असून ते आदर्श शासनकर्ते व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी इतिहासात महत्वपूर्ण ठसा उमटविला असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रकुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी शत्रूविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून महाराजांनी उत्तम शासनाचे एक उदाहरण ठेवल्याचे नमूद केले. लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर यांनी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत शौर्य, पराक्रम ध्येयवाद वा नियोजनबद्ध प्रशासन घडवून जनतेची सेवा केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यापीठाच्या प्रकाश पाटील, प्रणाली खिरोडे, शिल्पा पवार, आबा शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या विविध पैलुंविषयी माहिती दिली. संजय मराठे यांनी गीत सादर केले.

जळगावमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उंट, घोडे, आरास, चित्तथरारक कसरतींनी जळगावकरांचे पारणे फेडले. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून शोभायात्रेला सुरूवात झाली. नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे शिवतीर्थ मैदान नंतर शिवपुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला. मिरवणूकीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी मंत्री सुरेश जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, स्टेडियम ते जैन व्हॅलीपर्यंत धावण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी भाग घेतला. काव्यरत्नावली चौकापासून स्टेडियमपर्यंत महिलांची स्कुटर फेरी काढण्यात आली.