भय आणि प्रलोभन दाखवत मुलींचे धर्मातर केले जात असून हा प्रकार मध्य प्रदेशमध्ये चालणार नाही. ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून दोषींना शिक्षा केली जाईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. देवाची कृपा असल्याने मध्य प्रदेशमध्ये करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेतल्यानंतर चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मध्य प्रदेशमध्ये लागू झालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याचे समर्थन केले. हिंदुधर्मीय मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिले जाणार नाही. लव जिहादच्या कायद्यामुळे दोषींना १० र्वष शिक्षा होईल. आयुष्यच कारागृहात काढावे लागेल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. शेतकरी हित बघणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान झाला नाही. शेतकऱ्यांशी चर्चेची दारे उघडी आहेत. जे मैदानात मोदींशी सामना करू शकले नाहीत, ते असे राजकारण करीत असल्याची टीका चौहान यांनी केली. करोना लसीकरणाची चाचणी यशस्वी व्हावी तसेच जीएसटी वसुलीत वाढ होऊन अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.